Oil Seeds Crop : अमरावती विभागात तेलबियांचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात मोठी घट येणार असल्याचे संकेत आहेत. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.
राज्याचा कृषी विभाग तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. प्रत्यक्षात या पिकांपासून अपेक्षित असे उत्पादन होत नसल्याने ही पिके शेतकऱ्यांना परवडणारी राहिली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ केल्याचे दिसत आहे.
अमरावती विभागात मागील वर्षी २३ नोव्हेंबरपर्यंत सरासरी गळीत पिकांच्या सरासरी १ हजार २३१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६९ हेक्टर म्हणजेच ६ टक्केच पेरणी झाली होती. त्यात जवस या पिकाचे क्षेत्र निरंक होते, तर तिळाचे क्षेत्र ११८ पैकी २४ हेक्टर म्हणजेच २० टक्के होते.
यंदा अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात जवसाची पेरणी १० हेक्टरवर झाली आहे, तर करडई ११ आणि मोहरीचे पेरणी केवळ ८३ हेक्टरवर झाली आहे. यंदाही जिल्ह्यात सूर्यफूल आणि तिळाचे क्षेत्र निरंक आहे. हीच स्थिती विभागातील इतरही जिल्ह्यात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गळीत पिके हद्दपार होत असल्याचे दिसत आहे.
ही आहेत कारणे
* सिंचनासाठी अधिक पाणी लागणे
* मजूर न मिळणे
* कीड व रोगांचा प्रादुर्भाव
* हंगामात भाव पडणे
* सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव
* उत्पादन खर्च अधिक असणे
* अवकाळीमुळे वारंवार होणारे नुकसान
याशिवाय इतरही कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ
अमरावती विभागात तेलबियांचे क्षेत्र घटले असताना रब्बीच्या क्षेत्रात मात्र मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती विभागात रब्बीचे क्षेत्र १ लाख ७९ हजार ८२४ हेक्टरने वाढले आहे. गेल्यावर्षी ११ डिसेंबरपर्यंत अमरावती विभागात ४ लाख ९८ हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा ९ डिसेंबरपर्यंतच अमरावती विभागात ६ लाख ७८ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.