नांदगाव (जि. नाशिक ) तालुका कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सर्ग विकास समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ . पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत मौजे कर्ही (ता. नांदगाव) येथील पंढरीनाथ भिलाजी काकड यांच्या शेतात (दि.२२) रोजी जैविक निविष्ठा निर्मिती या विषयावर प्रेरणा कृषि शेतकरी गट कर्ही व जय श्रीराम शेतकरी गट एकवई या सेंद्रिय दोन गटांचे गावपातळीवरील शेतकरी सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे कृषि सहाय्यक, कर्ही संजय डोमाडे व आत्मा चे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.टी.कर्नर, सर्ग विकास समिती अकोला संस्थेचे प्रतिनिधी नितिन वारके हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणात वारके यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करणे त्यामध्ये सी. पी. पी.कल्चर, बायो डायनॅमिक कंपोस्ट खत निर्मिती, जीवामृत ,बीजामृत , दशपर्णी अर्क, निमार्क, दहा ड्रम थेअरी इत्यादी चे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले. तसेच या निविष्ठांचा सेंद्रिय पध्दतीने उत्पादन घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व किड व्यवस्थापनासाठी वापर करावा तसेच पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने बाबत सेंद्रिय प्रमाणाकिरण पध्दती, शेतमाल पॅकेजिंग, ग्रेडिंग व लेबलिंग करून विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच कृषि सहाय्यक संजय डोमाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रासायनिक खते व कीटकनाशके वापरल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले असून मानव, पशु, पक्षी व पर्यावरण यावर विपरीत परिणाम होत आहे. या साठी सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन करुन शेतकऱ्यांनी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून विक्री व्यवस्थेसाठी पिकाची मुल्य साखळी उभारावी असे संगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास गटातील योजनेत सहभागी असलेले कर्ही व एकवई या शेतकरी गटांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव व सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन एस. टी. कर्नर यांनी केले.
हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान