सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल ३३ हजार ते ५३ हजार ६००, तर सरासरी ४६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने रेशीम कोष उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. नांदेड जिल्ह्यात तुती लागवडीसाठी यंदा ११११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्यात तुतीची जुनी लागवड ३१२ एकरावर आहे, तर जून २०२३ मध्ये १५१ एकरांवर शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. दरम्यान, जून २०२४ मध्ये लागवड वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने महारेशीम अभियान राबविले होते. जिल्ह्यातील ११११ शेतकऱ्यांनी ११२० एकरांसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे लागवडपूर्व नोंदणी केली. रोजगार हमी योजनेंतर्गत १२१ एकर, तर ९२१ शेतकरी व सिल्क समग्र ०२ योजनेंतर्गत १९० शेतकऱ्यांनी १९९ एकरसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी रोपवाटिका घेण्यासंदर्भात प्रशिक्षणही झाले आहे. या शेतकऱ्यांची तुती लागवड जून २०२४ मध्ये होणार आहे, अशी माहिती रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे -यांनी दिली.
रेशीमरत्न पुरस्कार होणार जाहीर
■ नांदेड जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी रेशीम संचालनालयाकडून यंदापासून रेशीमरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर तुती लागवड असावी, जिल्हा रेशीम कार्यालयात त्यांनी नोंद केलेली असावी.
■ शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, कोषातून वर्षाला एक लाखाचे उत्पादन घेतलेले असावे, कोष विक्री केलेली पावती असावी, शासनाच्या निकषाप्रमाणे कीटकसंगोपनगृह बांधकाम केलेले असावे, अशा शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयातून अर्ज घ्यावा. यात निवड समितीकडून निवड झालेल्या प्रथम शेतकऱ्यास अकरा हजार, द्वितीय शेतकऱ्यास साडेसात हजार रुपये, तर तृतीय क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यास पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.