नसीम शेख
बिब्याचं पिवळं धमक फूल पाहिलं की कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. गुणकारी वनस्पती म्हणून परिचित असलेल्या बिब्याच्या फुलांची भुरळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच लागून असते.
सध्या रानावनातून मागे पिवळे धमक फूल आणि पुढच्या तोंडाला काळे- काळे बिबे लगडलेल्या बिब्याच्या झाडांची सर्वांनाच भुरळ पडली आहे.
यामुळेच एकेकाळी सोंगाड्या चित्रपटातील बिबं घ्या बिबं... शिकंकाई... या गीताने सर्वांनाच मोहिनी घातली होती. आजही जालना जिल्ह्याच्या टेंभुर्णीसह देळेगव्हाण परिसरात अनेक ठिकाणी रानावनात बिब्याची झाडे दृष्टीस पडतात.
मकरसंक्रात सणाच्या अगोदर बिब्याची फुलं पिकतात आणि बिबे तोडणीला येतात. फुलाला समोरून आलेले बिबे काढून घेतले की उरलेले पिवळे धमक फुल अनेकजण भाजूनही खातात. वानासाठी विशेष महत्व आहे.
गुणकारी बिबे
बिब्याचे अनेक गुणकारी उपयोग आहेत. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात सहज मिळणारी वस्तू म्हणजे बिबे होय. बिबे नाही असं घर शोधूनही सापडणार नाही. दृष्ट काढण्यापासून ते वरण शिजवताना टाकण्यापर्यंत बिब्याचे अनेक उपयोग आहे. काटा मोडला किंवा जखम झाली तर त्याला आजही ग्रामीण भागात बिब्याचा फणका दिला जातो. जखम भरण्यासाठी देखील बिब्याचे तेल वापरतात.
आयुर्वेदिक बिब्याची गोडंबी
• बिब्यापासून गोडंबी काढण्याचे काम मोठे जिकिरीचे. आजही जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील आढा, पासोडी भारज बुटूक या जंगल परिक्षेत्रात बिब्याची गोडंबी काढण्याचे काम केले जाते. हाताला तेल उभारू नये म्हणून महिला संपूर्ण हाताला कपडे गुंडाळून हे कष्टप्रद काम करीत असतात.
• भाजीला चव आणण्यापासून अनेक औषधी उपयोग या गोडंबीचे आहे. हिवाळ्यातील लाडू बनवण्यासाठी देखील या गोडंबीचा उपयोग केला जातो. म्हणून या गोडंबीला सध्या बाजारात १ हजार ४०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव आहे.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात