माळशेज परिसरातून शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत ७० ते ८० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे बाजारातकांदा प्रतिकिलो ३८ ते ४३ रुपये दराने विकला जात आहे. तर, कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव आला असून एक एकर लागवड करण्यासाठी रोपासाठी २० ते २२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.रोपाची मागणी वाढल्याने या वर्षी माळशेज परिसरात ८०% कांद्याची लागवड होईल असा अंदाज आहे.
सध्या माळशेज परिसरातील शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा संपत आला आहे. शेतकरी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात. अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करतात. रोपांची लागवडी योग्य वाढ झाली की ते विक्रीही असेल त्या बाजारभावाने विक्रीही करतात. माळशेज परिसरात यावर्षी कित्येक शेतकऱ्याचे टाकलेले रोप पाडाक झाले तर काही शेतकऱ्याचे उतरलेच नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची चांगली कांदा रोप आले त्यांनी आपली लागवड उरकून दुसऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या भावात मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची विक्री करत आहेत. काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपे विकत घेत असून आपली लागवड उरकून घेत आहेत.
अधिक वाचा: रब्बी कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना घ्यावयाची काळजी
बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात. जेव्हा कांद्याची टंचाई निर्माण होते तेव्हा भाव वाढतात सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नसल्यामुळेच सध्या कांद्याला ३८ ते ४३ रुपये प्रतिकिलो भाव आहे. तर, रोपाला एकरी २० ते २२ हजार द्यावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपला अधिक भाव आहे डिसेंबर अखेरपर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या कांद्याला भाव असल्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे लगबग सुरू आहे. तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
कांदा चाळीसाठी शासनाने मदत करावी
जुन्नर तालुक्यात माळशेज परिसर कांदा आगार म्हणून ओळखला जातो. कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. दरवर्षी या परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते. मात्र, कांदा साठविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडे कांदा चाळींची सोय नाही. त्यामुळे शेतातून कांदा काढला की तो लागलीच बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. व्यापाऱ्यांकडे कांदा साठविण्याची व्यवस्था असल्यामुळे याचा फायदा मोठे व्यापारी घेतात. भाव वाढले की शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच अधिक फायदा होतो. कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून सतत केली जात आहे.
कांद्याची आवक घटली
- कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत ७० ते ८० टक्क्यांनी घटली आहे.
- बाजारात कांदा प्रतिकिलो ३८ ते ४३ रुपये दराने विकला जात आहे.
- एक एकर लागवड करण्यासाठी रोपासाठी २० ते २२ हजार रुपये मोजावे लागत आहेत.