Join us

रायगड जिल्ह्यात भात बियाणांसाठी 'एक जिल्हा, एक दर' निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 2:39 PM

रायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो; परंतु अनेक ठिकाणी भात बियाण्याचे वेगवेगळे दर असल्याने येथील शेतकरी संभ्रमात पडले होते.

रायगड जिल्हा कृषी असोसिएशनने रायगड जिल्ह्यातील सर्व डीलर्स व कृषी निविष्ठा आणि भात बियाणे कंपनी यांची पेण येथे सोमवारी आगरी समाज हॉल पेण येथे खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती.

रायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो; परंतु अनेक ठिकाणी भात बियाण्याचे वेगवेगळे दर असल्याने येथील शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तालुक्यांत जाऊन खरेदी करत होते; परंतु याची दखल कृषी असोसिएशनने घेतली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील एक दर एक जिल्हा ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे, उपाध्यक्ष पराग वैरागी, जयवंत वाघ, अमोल पाटील, रमेश पाटील, परेश मोकळं, सल्लागार मितेश जाधव, सूत्रसंचालक विष्णू ऐनकर आदी उपस्थित होते.

बियाणांसाठी इतर तालुक्यात जायची गरज नाही- या निर्णयामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही तालुक्यात किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये प्रत्येकी भात बियाण्याचे एकच दर असणार आहे.- शेतकऱ्यांची होणारी लूट थांबणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे, असा यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

रायगड असोसिएशनचे काम अभिमानास्पद● कृषिधन सिड्सचे रायगड सेल्स अधिकारी गणेश सोनुने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात अनेक कृषी असोसिएशन आहेत; परंतु आठ जिल्ह्यांपैकी रायगड जिल्हा कृषी असोसिएशनचे काम अभिमानास्पद आहे.● यापुढेसुद्धा असे काम राहू द्या तसेच खरीप हंगामात जिल्ह्यात प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात बॅनर लावा आणि शेतकऱ्यांना विनंती करा की, भात बियाणे चेक करून घ्या, भात बियाणे लाल असेल, काळा दाणा असेल तर भात बॅग घेऊन जाऊ नका, दुसरी चेक करून घेऊन जा तसेच अनेक वेळा भातावर पळींज पडण्याचे प्रमाण वाढत आहे.● रसशोषक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके याची फवारणी करा. पळींज पडण्याचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले.

टॅग्स :भातरायगडशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणकोकण