अप्पू पटेल
गतवर्षी कांद्याला प्रारंभी ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. त्यानंतर १० त १५ रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु यावर्षी कांद्याचा भाव सुरुवातीलाच १४ ते १२ रुपये किलो एवढा राहिला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्याचा भाव पाहून डोळ्यांत पाणी येत आहे. शासनाने कांद्याला योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कांदा हे चार महिन्यांचे पीक असून, शेतकऱ्यांना हे परवडणारे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात. परंतु यावर्षी पदरमोड करूनही कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे कोणते उत्पन्न घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गतवर्षी कांदा काढणीच्यावेळी अवकाळी पाऊस नव्हता; परंतु यावेळेस ऐन काढणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या जवळा पांचाळ व परिसरात अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात. परंतु यावर्षी अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नुकसान होत आहे. यंदा कांद्याची लागवड केली नसती तर बरे झाले असते, असे शेतकरी बोलून दाखवत आहेत. कांद्याचे उत्पन्न एकरी १०० ते १२५ क्विंटलपर्यंत मिळत आहे; पण म्हणावा तसा भाव काही मिळत नाही. त्यामुळे तर शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा - तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा; भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे होईल विश्लेषण
अवकाळी पावसामुळे कांदा गेला सडून
यावर्षी जवळा पांचाळ व परिसरातील वडगाव, रेडगाव, गुंडलवाडी, यसफळ, सालापूर आदी गावांतील शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. परंतु तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्यावर लागवडीपासून केलेला खर्चही वाया गेला आहे. अवकाळीमुळे कांदा काही ठिकाणी सडूनही गेला आहे.
यावर्षी डिसेंबर महिन्यात एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. खत, पाणी, औषधाची फवारणी करून निंदणी केली. यासाठी साठ हजार रुपये खर्च झाला आहे. १५ एप्रिलपासून कांदा काढण्यास सुरुवात केली; पण ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर संकट आले आहे. दुसरीकडे भावही म्हणावा तसा मिळत नाही, असे इम्रान खान पठाण व संतोष सवंडकर यांनी सांगितले.