Join us

Kanda Vima एक रुपयामध्ये काढा कांद्याचा पीकविमा मिळेल ४६ हजार रुपये भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:02 AM

राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सातारा : राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

या योजनेअंतर्गत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची हमी असते. यंदा नुकसान झाल्यास बाजरला हेक्टरी १८ हजार तर कांद्याला ४६ हजारांपर्यंत भरपाई मिळू शकते. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागत होती, तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा.

पण, राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही झाली. यावर्षीही एक रुपयात पीकविमा देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.

जिल्ह्यात गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते.

त्यातच गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली होती. त्याचप्रमाणे यंदाही लाखो शेतकरी पीकविमा उतरवतील, असा अंदाज आहे.

रुपयात काढा पीकविमाया योजनेत सहभागी शेतकऱ्यांना फक्त पीकविमा एक रुपया भरून उर्वरित विमा काढता येणार आहे. रकमेचा हप्ता हा राज्य आणि केंद्र शासन भरणार आहे. यासाठी १५ जुलै ही पीकविमा भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे.

भाताला ४१, सोयाबीन ३२ हजार संरक्षित रक्कमशेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. नुकसान झाल्यास हेक्टरी मदत रक्कम निश्चित केली आहे. यामध्ये भाताला ४१ हजार रुपये, ज्वारी, २० हजार, बाजरी १८ हजार, नाचणी २० हजार, भुईमूग ४० हजार, सोयाबीन ३२ हजार, मूग २५ हजार ८१७, उडीद २६ हजार, कांद्यासाठी ४६ हजार रुपये विमा आहे.

योजनेत समाविष्ट होण्यासाठी कागदपत्रे• ७/१२ उतारा• खाते उतारा• ७-१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असल्यास पीकपेऱ्याचे स्वयंघोषणापत्र• बँक पासबुक• फोटो ओळखपत्र (आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड आदी)

खरिपातील या पिकासाठी जिल्ह्यात योजना लागूभात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, खरीप कांदा या पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

याच पिकांसाठी विमा उतरवता येणारसातारा - भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन.कोरेगाव - भुईमूग, सोयाबीन, उडीद, कांदा.खटाव - ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, कांदा.कऱ्हाड - भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन.पाटण - भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, उडीद.वाई - भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, नाचणी.जावळी - भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, नाचणी.महाबळेश्वर - भात अन् नाचणी.खंडाळा - बाजरी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, कांदा.फलटण - बाजरी अन् कांदा.माण - बाजरी, मूग, भुईमूग, कांदा.

विमा हप्ता कोठे भरावा• राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँक• सार्वजिनक सुविधा केंद्र• टपाल कार्यालय• विमा कंपनी प्रतिनिधी• प्रधानमंत्री पीकविमा योजना पोर्टल

अधिक वाचा: कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

टॅग्स :पीक विमापीककांदाबाजरीशेतकरीशेतीसाताराराज्य सरकार