Join us

Onion Crop : पावसामुळे कांद्याचे रोप पाण्यात; पुन्हा रोपे तयार करण्याची वेळ; बियाण्याची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 7:46 PM

Onion Crop : या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ७० टक्क्यापर्यंत कांद्याचे रोपे वाया गेली आहेत. रब्बी हंगामातील कांदा नाशिक, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तालुक्यात, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्येही कांद्याची लागवड केली जाते.

Pune :  राज्यभरामध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये कांदा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून रब्बी कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेले रोप पावसाच्या पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या रोपांची दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे.

मागील दोन आठवड्यापासून सोलापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांसह आणि विजेंच्या गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला पिके, फुल पिके, कापूस, सोयाबीन, मका, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ७० टक्क्यापर्यंत कांद्याचे रोपे वाया गेली आहेत. रब्बी हंगामातील कांदा नाशिक, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तालुक्यात, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्येही कांद्याची लागवड केली जाते. यासाठी शेतकर्‍यांनी कांदा रोपांची नर्सऱ्या केल्या आहेत. नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आता बियाणे पुन्हा खरेदी करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, दुबार पेरणीची (कांद्याची नर्सरी) वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होत आहे. तर बाजारात उपलब्ध असलेल्या बियाणांमध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे. खात्रीशीर बियाणे उपलब्ध नसल्यामुळे जे मिळेल तेच बियाणे वापरण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही.   

आमच्या पारनेर तालुक्यातील कांद्याचे जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे रोप पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांना कांद्याचे बियाणे परत खरेदी करावे लागले आहेत. यामुळे खात्रीचे बियाणे मिळण्याची शक्यता कमीच आहे.- गणेश लंके (कांदा उत्पादक शेतकरी, पारनेर)

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाशेतकरीपाऊसपीक