संतोष थोरात
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. शेतीची मशागत, बियाणे, मजुरी आणि खतांचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांचा लागवड ते पीक निघेपर्यंत मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे अपेक्षित दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा बियाणांचे दर वाढले. पर्यायाने तयार रोपांनाही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. बहुतांशी शेतकरी घरीच रोपे तयार करून त्याची लागवड करतात. यंदा खर्डा परिसरात चांगला पाऊस झाला.
त्यामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेत शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. खर्डा परिसर हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसरतील शेतकरी कांदा पीकही घेऊ लागले आहेत.
काही शेतकरी रोपे तयार करून कांदा लावतात तर काही थेट कांदा बियाण्यांची पेरणी करत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात कांदा लागवडीला सुरुवात झाल्याने रोपांना मागणी वाढली आहे.
कांदा पिकाचा खर्च सरासरी (एकरी)
शेत तयार करणे - ४ ते ५ हजार
बियाणे, रोपांसाठी - ४ ते ५ हजार
लागवडीसाठी - १० ते ११ हजार
खुरपणी - ८ ते १० हजार
काढणी - १५ ते २० हजार
खत - १० ते १५ हजार
एका एकराचा एकूण - ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत खर्च
दर चांगला मिळाला तर कांद्याचे चांगले पैसे मिळतात मात्र, दर पडलेले असले तर उत्पन्न खर्चही निघत नाही. यंदा खर्डा परिसरात लवकर कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. दर चांगला मिळेल, अशी अपेक्षा आहे. - रवी शिंदे, शेतकरी खर्डा
कांदा पीक लागवडीला मोठा खर्च होतो. त्यात अतिवृष्टी अथवा पाणीटंचाई झाली तर पीक वाया जाते. पीक हातात आल्यानंतरही चांगला भाव मिळाला तर उत्पन्न खर्च निघून दोन पैसे पदरात पडतात. अन्यथा कष्ट वाया जातात. यंदा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. - बाळू वीर, शेतकरी खर्डा
अधिक वाचा: भाजीपाला पिकातील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय