Join us

Onion Cultivation : राज्यभरात खरिप कांद्याची किती झाली लागवड? काय सांगते आकडेवारी?

By दत्ता लवांडे | Published: September 23, 2024 1:36 PM

Onion Cultivation : खरिप कांद्याची लागवड महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Pune : कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक पीक आहे. खालीवर होत असलेल्या दरामुळे कांद्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. कांद्याचा पेरा कमी झाला की दर वाढतात आणि पेरा वाढला की दर पडतात हे ठरलेले असते. मागील एका वर्षभरात कांदा निर्यातबंदी, कांद्यावरील निर्यातशुल्क आणि किमान निर्यातमुल्याच्या अटीमुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने यावरील निर्बंध कमी केले आहेत. (Maharashtra Onion Cultivation Latest Updates)

दरम्यान, यंदा खरिपामध्ये राज्यातील सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये चांगली लागवड झाली आहे. पावसाळी कांदा हा तीन महिन्यात काढणीला येतो. तर सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत खरिप कांद्याच्या लागवडी सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक अजून वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या लेट खरीप कांद्याची लागवड सुरू आहे. राज्यभरामधील कांद्याच्या खरीप लागवडीचा विचार केला तर १ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. 

यंदा चांगल्या पावसामुळे राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर रेल्वेच्या वॅगनमधून कांद्याची भारतभर निर्यात केली जाणार आहे. नोव्हेंबरपासून वॅगनद्वारे कांद्याची वाहतूक केली जाणार असून यामुळे आता कांद्यावरील भारतांर्गत लागणारा वाहतूक खर्च कमी होऊन व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या कांदा वाहतुकीसंदर्भातील पुढाकारामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात कांद्याची वाहतूक शक्य आहे. 

कोणत्या जिल्ह्यात कांद्याची किती लागवड?१) नाशिक - २१ हजार ९३१ हेक्टर२) अहमदनगर -३२ हजार ६६१ हेक्टर३) सोलापूर - ३७ हजार २३० हेक्टर४) धाराशिव -१५ हजार ६०९ हेक्टर५) पुणे - ८ हजार ३२७ हेक्टर६) छत्रपती संभाजीनगर - ४ हजार ४८५ हेक्टर७) बीड  - ५ हजार ६७८ हेक्टर८) सातारा -३ हजार ३८७ हेक्टर९) धुळे  - ३ हजार ५६९ हेक्टर१०) जळगाव - १ हजार १९७ हेक्टर

राज्यातील एकूण  लागवड - १ लाख ३६ हजार ४२५ हेक्टर

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीपीक