Join us

Onion Disease : कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव; वेळीच करा उपाययोजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 6:01 PM

गेल्या काही वर्षांत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने, नगदी पीक असलेल्या तालुक्यातील कांदा पिकाला त्याचा फटका बसत आहे. (Onion Disease)

Onion Disease : 

जयेश निरपळ

गंगापूर :  गेल्या काही वर्षांत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने, नगदी पीक असलेल्या तालुक्यातील कांदा पिकाला त्याचा फटका बसत आहे. वातावरण बदलामुळे कांद्यावर तुडतुडे, डाऊनी, करपा, गाठीची सड, मर आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 

सतत ढगाळ वातावरण, सकाळी पडणारे धुके, अवेळी पडणारा पाऊस यांचा परिणामही कांद्यावर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने जमिनीतील कांदा सडू लागला, तर सततच्या वातावरण बदलामुळे पात पिवळी पडून सुकून जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. 

यामुळे शेतकऱ्यांना कांद्याची पात हिरवीगार करण्यासाठी महागडी औषधे खरेदी करून फवारणी करावी लागत असून, खतांचा डोसही वाढवावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत खतांच्या किमती वाढल्या आहेत. 

डिझेलचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्चही वाढला, तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा बियाण्यांचे भावही वाढले आहे. या वर्षी वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने चांगला पाऊस होण्याचा अंदाज व तसे वातावरण सध्या कांदा लागवडीस पोषक झाले होते. 

बहुतांश शेतकरी खरीप व रब्बी पिकांबरोबरच काही प्रमाणात पावसाळी कांदा पिकाकडे वळला असल्याचे चित्र सध्या गंगापूर तालुक्यात दिसून आले. मोठ्या आर्थिक लाभाच्या अपेक्षेवर शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत.

नुकसाभरपाई द्यावी

काही नवं-जुने करून मोठ्या आर्थिक अपेक्षेने कांदा लागवड केली; परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने भरपाई द्यावी.- ईश्वर राजपूत, कांदा उत्पादक शेतकरी, गंगापूर

फवारणी करावी

धुक्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे कांदापिकाला तितकासा फरक पडत नाही. पाऊस खूप झाल्यानंतर ऊन पडल्यावर जमिनीतील ओलावा कमी होतो. शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करावी. त्याचा फायदा पिकाला होईल. - बी. जे. जायभाये, तालुका कृषी अधिकारी

कांदा बियाणे किमतीत वाढ

मागीलवर्षीच्या तुलनेत काही कंपन्यांचे कांदा बियाणे १ हजार ५०० ते १ हजार ६०० रुपये प्रतिकिलो होते. या वर्षी कांदा बियाणे २ हजार ते ३ हजार प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बियाण्यांची झालेली दरवाढ शेतकऱ्यांसाठी खर्च वाढविणारी ठरत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकांदापीक व्यवस्थापनशेतकरीशेती