धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, बारूळ, सिंदफळ, अपसिंगा, कामठा, कात्री, सावरगाव, केमवाडी, काटी, पिंपळा आदी गावांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर कमी झाले असून, यामुळे झालेला खर्चही पदरात पडत नसल्याने आर्थिक गणित कोलमडल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने खरिपातील पिकांनी शेतकऱ्यांना ठेंगाच दिला. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कांद्याची लागवड केली होती. मात्र, वातावरणातील बदलामुळे तसेच अवकाळी पावसाने उत्पादनात घट निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांखाली कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकरी सुखावला होता. खरिपाचे पीक गेले तरी आता कांद्यावर काहीतरी ताळमेळ लागेल, अशी स्वप्ने पाहात होता. मात्र, केंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने कांद्याचे भाव एकदम कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
सध्या माझ्या दीड एकरावरील कांद्याची काढणी चालू आहे. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात घट दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव एकदम कमी झाले असल्याने झालेला खर्चही निघतो की नाही, अशी परिस्थिती आहे, निर्यातबंदी उठवली तरच शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल.- कैलास बेडगे, कांदा उत्पादक शेतकरी
कांदा लागवडीसाठी रान तयार करणे, रोप तयार करणे, खताच्या मात्रा, फवारणी, खुरपण, लाइट बिल, काढणी त्याचबरोबर मालासाठी पिशवी यासाठी एकरी जवळपास ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. कांदा काढल्यानंतर त्याच्या वाहतुकीचा खर्च वेगळाच; परंतु, सध्याचे बाजारभाव पाहता ५० ते ५५ हजार रुपयांपर्यंतच रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार असल्याने झालेल्या खर्चाचा हिशोबही लागतो की नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे.
आमच्या भागात कांदा काढणी चालू आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे वीस टक्के कांदा डॅमेज दिसून येत आहे. सोलापूर बाजारपेठेत आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता बाजारभाव पडल्याने मागचेच वर्ष बरे होते म्हणण्याची वेळ आली आहे. - महादेव नकाते, उत्पादक, केमवाडी
आमच्या भागात सरासरी एकरी ११० ते १३० बैंग उत्पादन निघते. मात्र, यावर्षी ते एकरी ६० ते ७० बॅगवर आले आहे. उत्पादनात पन्नास टक्के घट झाली असतानाच दरही कोसळले आहेत.-नवनाथ गोरे,कांदा उत्पादक, आपसिंगा