Join us

यंदा कांद्याचे गणित चुकले आता किमान काढणीचा खर्च तरी निघू द्या; उत्पादक शेतकऱ्यांची आर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:33 IST

सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत.

बाळकृष्ण पुरोहितभेंडा: सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदाकाढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत.

एकीकडे काढणीचे दर वाढलेले असताना दुसरीकडे बाजारात कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत उत्पन्न खर्चही भागणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा लागवड आणि काढणीसाठी मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लागवडीचाच दर काढणीलाही लावला जातो. यात काढलेल्या कांद्याचा एकाच ठिकाणी मोठा ढीग करायचा असेल तर एकरी दीड ते दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात.

कांदा काढणाऱ्या मजुरांची मोठी सरबराई करावी लागते. त्यांना त्यांच्या घरापासून शेतात आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था, पिण्यासाठी थंड पाणी देणे, सरबत द्यावे लागते. तरीही शेतकऱ्यांना वेळेत मजूर मिळत नाहीत.

पावसाच्या इशाऱ्यामुळे धावपळमागील आठवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस झाला. आताही कधी पाऊस येईल हे सांगत येत नाही. आपले पीक पावसात सापडू नये, यासाठी शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी धावपळ सुरू आहे. प्रसंगी मजुरांना जास्त पैसे देऊन काम द्यावे लागते.

रंग टिकण्यासाठी झाकावा लागतोय कांदाकांदे उपटल्यावर मागे लगेच पात कापणी करतात. काही ठिकाणी छोटे छोटे ढीग करतात तर काही ठिकाणी बरीच मोठी कांद्याची पोळ लावून ती कांद्याच्या पातीने झाकून टाकली जाते. झाकल्यामुळे उन्हाचा परिणाम कांद्यावर होत नाही व रंग टिकून राहतो.

शेतकऱ्यांना चांगल्या दराची प्रतीक्षा- मध्यंतरी कांद्याला प्रति क्विंटलला अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत होता. आता कांद्याचे दर उतरले आहेत.- एक नंबरच्या कांद्याला १३०० ते १४०० च्या पुढे भाव मिळत नाही. सध्या व्यापारी शेतात जागेवर १३०० ते १४०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा खरेदी करत आहेत. मात्र, चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी सध्या कांदा चाळीत ठेवत आहेत.

कांदा लागवड व काढणी अशा दोन्ही वेळेस एकरी १४ हजार रुपये खर्च झाला आहे. खते, बियाणे व फवारणीसाठी एकरी १३ हजार रुपये खर्च झाला. सध्या कांद्याचे भाव कमी झाल्याने शेती परवडत नाही. कांद्याला किमान प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळणे गरजेचे आहे. - अशोक साबळे, शेतकरी, भेंडा बुद्रुक

अधिक वाचा: २० गुंठे कारल्याची शेतीने शेतकरी प्रमोद यांना मिळवून दिला आर्थिक गोडवा; वाचा सविस्तर

टॅग्स :कांदापीकशेतकरीशेतीकाढणीअहिल्यानगरबाजारमार्केट यार्डकामगार