लोकसभा निवडणुकीत सत्ताधऱ्यांना कांदा भोवला म्हणून सरकार कांद्याच्या बाबतीत सावध पवित्र्यात राहील व कांद्याला चांगले दिवस राहण्याची अपेक्षा होती, परंतु डिसेंबर महिना उजाडताच लाल कांद्याची लाली उतरायला सुरुवात होऊन तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक घसरण होऊन लाल कांदा हजार- पंधराशे रुपये क्विंटल विकावा लागत असल्याने लाल कांद्याचे मागचे पाढे पंचावन्नच असे म्हणण्याची वेळ आली असून, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने लाल व उन्हाळी अशा मुख्य दोन प्रकारात होते. यात खरीप व लेट खरीप हंगामात लाल कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तेही जेथे पाट पाण्याची हुकमी सोय नाही, पावसाच्या भरवशावर शेती अवलंबून आहे. जानेवारी उजाडला की पाणीटंचाई डोके वर काढायला लागते.
अशा भागातील शेतकरी ना ऊस, ना द्राक्ष, ना फळबागा लावू शकत. मग अडीच-तीन महिन्यांत येणारे पीक लाल कांदा होय. त्यामुळे चांदवड, देवळा, येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगाव, सटाणा, आदी भागातील (पाट-पाण्याची सोय असलेला भाग वगळता) शेतकऱ्यांचे लाल कांदा हे नगदी पीक ठरले आहे. या लाल कांद्यावरच वर्षाची गुजराण अवलंबून असते. त्यात लाल कांद्याची साठवणूक क्षमता कमी म्हणून काढणी पश्चात तो ८-१० दिवसांत विकणे क्रमप्राप्त असते.
या अगतिकतेचा सरकार कधी तरी विचार करेल का हा प्रश्न आहे. याचा उत्पादन खर्चही उन्हाळी कांद्यापेक्षा अधिक अन् उत्पादन कमी. अशा लाल कांद्याची आवक सुरू झाली की दसरा, दिवाळी जेमतेम नोव्हेंबर अखेर उन्हाळी कांद्याच्या तेजीची पडछाया लाल कांद्यावर पडते. परंतु, याचा लाभ खूप कमी शेतकऱ्यांना मिळतो.
मात्र, डिसेंबर उजाडताच लाल कांद्याच्या दराला उतरंड लागते, मग रस्ता रोको, लिलाव बंद वगैरे तत्कालिक व्यक्त होणे होते, हे वर्षानुवर्षाचे ठरलेले समीकरण आहे. लाल कांदा उत्पादकांना पुन्हा मागचे पाढे पंचावन्नच म्हणण्याची वेळ आली आहे.
निर्यात शुल्काने शेतकऱ्यांची चिंता वाढली
• गेल्या काही वर्षांपासून कांद्याचे रडगाणे सुरू आहे. कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्काचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. सध्या कांदा पिकावर २० टक्के निर्यात शुल्क आकारले जात असल्यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा आता बाजारात येतो आहे. याचा मोठा शेतकऱ्यांना बसत आहे.
• गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. यात ३० क्विंटलच्या ट्रॉलीमागे शेतकऱ्यांचे ३० ते ४० हजारांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. अशा नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर नवल. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटले आहे.
हिवाळा संपत आला की पाणी आणायला लागते. त्यामुळे अडीच-तीन महिन्यांत येणारे पीक म्हणून लाल कांदा करायला लागलो. तसे पाहतो डिसेंबर सुरू झाला की लाल कांद्याचे भाव पडायला सुरुवात होते, हा कायमचा अनुभव आहे. परंतु, यंदा तसे काही होणार नाही असे वाटले, पण झाले तेच. - सुकदेव आवारे, शेतकरी पन्हाळे, ता. चांदवड
दरवर्षी लाल कांद्याची आवक सुरू झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस बरे भाव मिळतात, परंतु डिसेंबर सुरु झाला की लाल कांद्याचे भाव एकदम पडतात. मग नेहमीच आवक वाढली, निर्यात बंदी आहे, निर्यात शुल्क आहे असे कारण सांगितले जातात. परंतु, या नेहमीच्या समस्येवर तोडगा का काढला जात नाही. - भाऊसाहेब पवार, शेतकरी, विटावे, ता. चांदवड.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात