Pune : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तणनाशक फवारणीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सुमारे १०० एकरांहून अधिक क्षेत्रातील कांदा पिक पूर्णतः खराब झाल्याची माहिती मिळताच, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या नियोजित दौऱ्याला स्थगिती देत रात्री उशिरा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली.
एका खाजगी कंपनीच्या तणनाशकाच्या फवारणीमुळे देवळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पीक जळून गेले आहे. उन्हाळ कांद्याचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कृषीमंत्र्यांनी केली तातडीची पाहणी
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती सांगितली.
नुकसान भरपाईसाठी पावले उचलण्याचे निर्देश
या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री कोकाटे यांनी संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना तणनाशक औषधांचे परीक्षण करण्याचे आणि सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेळेची जाण ठेवून धाव घेतल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. मंत्री कोकाटे यांच्या या तातडीच्या आणि संवेदनशील कृतीमुळे शेतकऱ्यांना आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.