पाचेगाव : नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासापोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कांदा व्यापारी सुहास अनिल बांद्रे (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बेलपाढंरी, जेऊर हैबती, पाचेगाव, नेवासा बुद्रुक परिसरातील १६ शेतकऱ्यांची कांदा व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बाळासाहेब भाऊसाहेब पेचे (रा. साईनाथनगर, पाचेगाव, ता. नेवासा) यांनी याबाबत फिर्याद दिली.
बाळासाहेब पेचे यांनी चाळीमध्ये कांदा साठवलेला होता. चुलतभाऊ विठ्ठल गीताराम पेचे याने अंदाजे १५ टन कांदा व्यापारी सुहास अनिल बांद्रे यास विकला होता.
चुलत भावाला कांदा विक्रीचे संपूर्ण पैसे मिळाले होते एकेदिवशी व्यापारी सुहास अनिल बांद्रे हा बाळासाहेब पेचे यांच्या घरी आला. त्याने कांदा द्यायचा आहे का? अशी विचारणा केली. पेचे यांनी चाळीतील १६ टन ६१९ किलो कांदा हा ४१ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे कांदा व्यापारी सुहास बांद्रे यास दिला.
ठरल्याप्रमाणे बांद्रे याने ६ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश तत्काळ दिला. १३ ऑक्टोबरला आयडीएफसी बँकेच्या श्रीरामपूर शाखेत वटविण्यास टाकला. परंतु, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही.
कांदा व्यापारी सुहास अनिल बांद्रे याने बाळासाहेब पेचे यांच्यासह बेलपाढंरी, जेऊर हैबती, पाचेगाव, नेवासा बुद्रुक परिसरातील एकूण सोळा कांदा उत्पादक व विक्रेते शेतकरी यांचा विश्वास संपादन करताना थोडेफार पैसे व धनादेश देऊन कांदा खरेदी केला.
६१ लाख ७४ हजार ६५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत.व्यापाऱ्याकडून
उडवाउडवीची उत्तरे
याप्रकरणी पेचे यांनी वेळोवेळी व्यापारी बांद्रे यांना कांद्याच्या रकमेबाबत विचारणा केली. परंतु, त्याने नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनंतर त्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. तसेच, व्यापाऱ्याच्या घरी गेल्यावर तो आढळून आला नाही. त्यावेळी पेचे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.