राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित झाले नव्हते अशा उर्वरित लाभार्थ्यांना अनुदानाचा पूर्ण लाभ मिळणार आहे. यासाठी पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ५५० कोटींच्या रकमेमधील शिल्लक ८४ कोटी १ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन किंवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. या अनुदान वाटपाचा निर्णय २० एप्रिल २०२३ राजी घेण्यात आला होता. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त् २०० क्विंटलच्या मर्यादेत ७० हजार प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या तांत्रिक बाबींमुळे नाकारण्यात आलेल्या ४ हजार ५९० लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरीत करण्यात आले नव्हते. या लाभार्थ्यांना संपूर्ण १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १५ कोटी ४१ लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये एकाच लाभार्थ्याला दुबार अनुदान वितरित होणार नाही. तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.