पारनेरबाजार समितीत कांद्याला क्विंटलला अकराशे ते बाराशे रुपये भाव मिळाल्याने बुधवारी (दि.८) सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. तसेच यावेळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चाही नेण्यात आला. जोपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याच दरम्यान कैलास भानुदास गादे वय ६२ राहणार खुणेगाव (ता. नेवासे) यांनी घोडेगाव मार्केट यार्डात विष घेतले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी अकोले येथेही लिलाव बंद पाडत अकोले-देवठाण रोडवर रास्ता रोको आंदोलन देखील कांदा उत्पादक शेतकर्यांनी केले.
विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
कांदा उत्पादक भानुदास गादे यांना चार एकर जमीन आहे. त्यापैकी एका एकरवर त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. उत्पादित कांद्यापैकी २५ गोण्या कांदे घेऊन ते घोडेगावच्या कांदा मार्केटमध्ये आले होते. भाव मिळत नसल्याचे पाहून त्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घोडेगाव मार्केट यार्डात विष घेतले. त्यांना वडाळा मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पारनेरला ही लिलाव बंद
पारनेर बाजार समितीत बुधवारी कांद्याला क्विंटलला अकराशे ते सोळाशे रुपये भाव निघाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी चांगल्या कांद्याला २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपये भाव देण्याची मागणी केली. मात्र यावर काहीही तोडगा न निघल्याने शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद पाडला.
हेही वाचा - Onion Issue : कांदा निर्यात खुली, पण भाव काही वाढेनात! वाचा नेमकं काय घडतंय?