अक्कलकोट : यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३,९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केले आहे. प्रारंभी पेरणी, लागवड केलेल्यांनी विविध अडचणीवर मात करीत सध्या कांदा काढणीला सुरुवात केली आहे.
सध्या कांद्याला चांगला दर असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील वर्षी कांद्याचा दर अचानक कमी झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी याकडे शेतकरी पाठ दाखवतील, असं वाटत असताना पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.
कृषी विभागाचे अक्कलकोट, वागदरी, तडवळ, मैंदर्गी असे चार मंडळ आहेत. त्यापैकी तडवळ भागात सर्वाधिक तर किणी, चपळगाव, शिरवळ, वागदरी, सलगर, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, तोळणूर, नागणसूर, करजगी आदी गावातील शिवारात कांद्याची लागवड केली आहे.
किरकोळ बाजारात मिळतोय ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दर
सध्या कांद्याला किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दर आहे. एकट्या तडवळ भागात सर्वाधिक तब्बल १५०० हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा चांगला दर मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकरी मालामाल होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात मागील वर्षी ४०६९ तर यंदा ४ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड केली आहे. मागच्या वर्षी दर मिळाला नसल्याने शेतकरी अडचणी आले होते. यंदा चांगला दर मिळण्याची आशा आहे. मध्यंतरी कांदा पिकावर करप्यासारखा रोग काही भागात झपाट्याने वाढत असताना औषध फवारणी करून शेतकऱ्यांनी कंट्रोल केले आहेत. सध्या प्रतिक्विंटल साडेतीन ते साडेचार हजार रुपये दर आहे. दर असाच राहिल्यास शेतकऱ्यांसाठी कांदा बंपर पीक म्हणून लाखोंचे उत्पन्न देणार आहे. - हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी
मागच्या वर्षी दर घसरल्याने अनेक शेतकऱ्याचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकरी किरकोळ विक्री आठवडा बाजारात गेले होते. यामुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टळले. यंदा चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा कांदा पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. - बापू पाटील, शेतकरी, केगाव बु.