Join us

Onion Mahabank : राज्यातील 'या' ४ जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक सुरू करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:13 PM

Onion Mahabank : सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवता येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हवा तेव्हा आपला माल विक्री करता येणार आहे.

Onion Mahabank : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्क आणि निर्यातमूल्य वाढवल्याने निर्यात मंदावली आहे. त्याचबरोबर कांद्याचे दर कमीजास्त होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. राज्यामध्ये अणुउर्जा आधारित महाबँक प्रकल्प नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्‍यांनी दिल्या आहेत. 

अधिक माहितीनुसार, कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. परमाणु आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

कांदा हे नाशवंत पीक असून अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. याठिकाणी हिंदुस्थान अग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांद्याची बँक करण्याचे प्रस्तावित आहे. कांद्याच्या महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल. कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विक्री करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदा