Join us

एनसीसीएफकडून कांदा खरेदी सुरू, नाशिक जिल्ह्यात केवळ दोन केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:00 AM

कांदा भावाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर एनसीसीएफ मार्फत शक्यतो रब्बी कांद्याचीच खरेदी केली जाते, परंतु यंदा प्रथमच खरीप कांद्याची खरेदी ...

कांदा भावाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर एनसीसीएफ मार्फत शक्यतो रब्बी कांद्याचीच खरेदी केली जाते, परंतु यंदा प्रथमच खरीप कांद्याची खरेदी करण्यात येत आहे. किरकोळ बाजारातील भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी खरेदी केंद्रे उघडण्याचे नियोजन एनसीसीएफकडून करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोनच केंद्रे सुरू होऊ शकली. इतर सर्व केंद्रे 17 नोव्हेंबरपर्यंत सुरू होतील, असे एनसीसीएफ नाशिक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला असून शेतकरी रत्यावर उतरले आहेत. बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाले असले तरीही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष कमीकरण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) यांच्या वतीने कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

निफाड, चांदवड, नामपूर, मालेगाव, उमाराणे, पिंपळगाव, मुंगसे, लासलगाव, विंचूर, ताहाराबाद, दाभाडी आणि देवळा या ठिकाणी एनसीसीएफचे केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यासाठीची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे, मात्र सद्य:स्थितीत केवळ दोनच केंद्रे सुरू होऊ शकली. पिंपळगाव आणि विंचूर येथे सोमवारी खरेदी केंद्रे सुरू होती. 

दोन दिवसांपूर्वी लासलगावला देखील केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु प्रतिसाद नसल्याने पहिल्याच दिवशी केंद्र बंद करावे लागले. सध्या जिल्ह्यात दोनच ठिकाणी केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. उर्वरित ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकमध्ये अकरा ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन होते प्रत्यक्षात दोनच ठिकाणी केंद्रे सुरू आहेत.अडीच ते तीन हजार रुपये क्विंटल दर

एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे सुरू केली असून पहिल्या दिवशी 3 हजार रुपये प्रति क्चिटल दराने कांदा खरेदी करण्यात आला. तर, बुधवारी (दि.13) 2700 इतका दर देण्यात आला. दर हा कमी अधिक होणार असून लासलगाव आणि पिपळगाव बाजार समितीच्या लिलावात येणाऱ्या भावाच्या दरात एनसीसीएफ- कडून कांद्याचे ठर ठरविले जातात. मात्र, अडीच ते तीन हजार रुपयांसाठी  शेतकरी कांदा केंद्रांवर आणत नसल्याचे दिसते.

एनसीसीएफ नाशिक विभागाकडून 12 केंद्रांवर लाल कांद्याची खरेदी करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव आणि विंचूर येथे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात इतर केंद्रे सुरु होतील.- सागर शर्मा, इन्चार्ज, नाशिक एनसीसीएफ कार्यालय

टॅग्स :कांदामार्केट यार्ड