नाशिक: मागच्या अनेक दिवसांपासून कांदाप्रश्नीशेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी, त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि दिवसेंदिवस घसरत असलेले दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तर कांद्याचे भांडार असलेल्या नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कांदाप्रश्नी लढा उभारणार आहेत.
दरम्यान, आज (२४ डिसेंबर) कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाबाबत नाशिक जिल्हा कांदा उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांची संयुक्त बैठक उत्तम कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत कोसळणाऱ्या कांद्याच्या दराबाबत सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, प्रहार चे जिल्हाध्यक्ष जगन काकडे व स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या दोन संघटना एकत्र लढणार असल्याचं सांगितलं आहे.
त्याचबरोबर नवीन वर्षात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदा उत्पादकांचा राज्यव्यापी मेळावा लासलगाव येथे घेण्यात येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी सांगितले.
या बैठकीत वेळी स्वाभिमानीचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, कुबेर जाधव, जयेश जगताप, गोरख संत, केदारनाथ नवले, संजय जाधव यांनी आपली कांदा प्रश्न व भूमिका मांडली तसेच निफाड तालुका अध्यक्ष श्री गजानन घोटेकर मच्छिंद्र जाधव, रवींद्र तळेकर, गणेश चांदुरे, श्रावण नवले, दिगंबर धोंडे, दीपक शिंदे, सुदाम देशमुख, शैल शेख, सागर गवळी दीपक घोटेकर सह पदाधिकारी उपस्थित होते.
निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्चसुद्धा शेतकऱ्यांना करता येत नाही एवढी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
म्हणून येत्या काही दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकसारख्या विचारांच्या संघटनासुद्धा आमच्याशी जोडत असून त्यांच्या साहाय्याने कांदा प्रश्नी आम्ही लढा उभारत आहोत.
- निवृत्ती गारे (स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक जिल्हाध्यक्ष)