Join us

कांदा टोमॅटो बाजारभावांच्या कात्रीत शेतकरी सापडतोय.. कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 3:30 PM

स्वत: मिळतो म्हणून ग्राहकांना, तर जास्त पिकतो म्हणून शेतकऱ्यांना टोमॅटो दोघांनाही आवडतो, पण बाजार भावांत काही तक्रारी आल्या की दोघांचीही अडचण होते.

साधारण असाच जून किंवा जुलै महिना होता २०१२ सालचा. मराठवाड्याचा अजून एक भीषण दुष्काळ पाहून झाला होता. अशा कठीण परिस्थितीत पाण्याशी संबंधित नाविन्यपुर्ण पध्दतीने काम करणाऱ्या श्री. मधुकर धस यांच्यासोबत मी त्यांनी काम केलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावात फिरत होतो. एक पाणीदार माणूस म्हणून मधुकर भाऊंची ओळख होतीच पण त्यांची एक नवीनच बाजू मला फिरताना समजून आली. नुकत्याच दुष्काळाने तापून निघालेल्या माळरानावर नव्याने पडलेल्या पावसाने फक्त गवतच नव्हे आणि अनेकविध वनस्पती उगवून आल्या होत्या आणि मधुकरभाऊ मला अनेक वनस्पतींची माहिती आणि उपयोग सांगत होते. त्यातल्या जवळजवळ १०-१२ वनस्पती अशा होत्या कि ज्यांचा भाजी म्हणून आहारात सहज उपयोग करता येण्यासारखा होता.

मेंढपाळ कुटूबात जन्मलेल्या आणि रानामध्ये मेंढ्या चारण्यात बालपण गेलेल्या मधुकरभाऊंसारखं अनुभवसिध्द ज्ञान ज्यांच्याकडे आहे आणि जे त्याचा जीवनात उपयोग करू शकतात त्यांना टोमॅटोची किंमत १०० रुपये किलोपेक्षा जास्त झाली तरी काही फरक पडणार नाही. ज्यांना फरक पडतो ते सर्व लोक आज चिंतेमध्ये आहेत. या किंमती खाली उतराव्या जेणेकरून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाहीत म्हणून सरकारे चिंताग्रस्त आहेत. एवढ्या प्रचंड किंमतीचा स्टॉक चोरांपासून सुरक्षित रहावा म्हणून व्यापारी चिंतेत. आपलं भाजीपाल्याचं बजेट कोसळलं म्हणून गृहिणी चिंतेत. 

गंमत म्हणजे कांदा आणि टोमॅटो या दोन्ही भाज्या बक्कळ उत्पादन देणाऱ्या म्हणून प्रसिध्द आहेत शेतकऱ्यांमध्ये. पण पोषण मुल्यांच्या बाबतीत या दोन्ही भाज्या अतिगरीब वर्गातील म्हणता येतील. म्हणजेच जीवनसत्वे, खनिज द्रव्ये यांचे प्रमाण इतर अनेक भाज्यांपेक्षा या दोघांमध्ये कमी असते पण त्यांच्या स्वस्त किंमतीमुळे त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. वर्षातील काही महिने असे असतात कि त्यांचा बाजारात होणारा पुरवठा कमी होतो आणि साहजिकच त्यांच्या किंमती वाढत जातात.

केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने लगेचच टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी एक हॅकॅथॉन काढली. त्याचा फायदा कोणाला होईल तेंव्हा होवो, पण , टोमॅटो आणि कांदा खाल्ला नाही तर माणसाच्या जीवनात फार काही फरक पडणार नाही एवढं मात्र निश्चित. पण तरीही हा फरक मात्र पडताना दिसतो कारण आपल्या जेवण शिजवण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. आमचा बाब्या पालेभाजी खात नाही म्हणून आया जिथे कौतुकाने तक्रार करतात तिथेच सगळी गोम आहे.

देशावरच्या ग्रामीण भागात जेंव्हा पूर्वी महिला शेतात काम करायला जात असत तेंव्हा पिकात वाढणारी कितीतरी तणांची सरळ घरात आवक होऊन त्याची भाजी शिजत असते. विदर्भात जेंव्हा शेतकऱ्यांना विचारलं तेंव्हा उत्तर मिळालं की शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत असल्यामुळे अशा भाज्या आता मिळतच नाहीत. आमच्याकडे कोकणामध्ये अशा अनेक भाज्या जंगलात, बांधावर उपलब्ध असतात पण इथे शहरी मानसिकता इतकी बोकाळली आहे की त्याला हीन समजलं जातं आणि त्याचं असलेलं पारंपरिक ज्ञान गावात राहणाऱ्या लोकांकडूनच नष्ट होत चाललं आहे.

गावातही आता सगळेच शेतकरी भाजीपाला लावत नाहीत आणि बहुतांश लोक बाजारात मिळणारे टोमॅटो आणि तत्सम काही निवडक भाज्या आता सगळे लोक खातात आणि जेंव्हा त्यांचा हंगाम नसतो तेंव्हा त्यांच्या किंमती वाढल्या म्हणून तक्रार करत बसतात. झापडं लावून फटके खात चालत राहायची लोकांनाही सवय झाली आहे.

सचिन पटवर्धनई-मेल: smpkri@hotmail.com, (लेखक ग्रामीण विकसन क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

टॅग्स :कांदालागवड, मशागतशेती