केंद्र सरकार अंगीकृत नाफेड व एनसीसीएफ प्रत्येकी अडीच लाख टन कांदा खरेदी यंदादेखील करणार आहे. संबंधित या दोन संस्थांच्या केंद्रीयस्तरीय अधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत कांदा खरेदीबाबतची माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातून पाच लाख टन कांदा घेऊन केंद्र सरकार या बदल्यात शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचे पेमेंटअदा करेल, असे अधिकाऱ्यांनी मोठ्या जोशात सांगितले, पण कांद्याला भाव काय देणार? याबाबत मात्र सोयीस्करपणे मौन बाळगले. मात्र यंदापासून कांद्याचे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पूर्वी नाफेड, एनसीसीएफ फेडरेशनमार्फत कांदा घ्यायचे. त्यामुळे सरकार फेडरेशन शेतकरी असे पेमेंटचे सूत्र होते.
पत्रकार परिषदेस एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिशा जोसेफ चंद्रा, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे संचालक एस. सी. मीना, नाफेडचे अर्थविषयक सल्लागार आय. एस. नेगी, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार सिंग, नाशिकचे मुख्य प्रतिनिधी निखिल पाडदे उपस्थित होते. जिल्ह्यातील ८ ते १० खरेदी केंद्रांवर कांदा खरेदीचे नियोजन असल्याचे जोसेफ चंद्रा यांनी सांगितले; मात्र कोणते केंद्र सुरू होतील, पहिल्या टप्प्यात किती केंद्र सुरू होतील याबाबत; मात्र त्यांनी माहिती दिली नाही. नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठ ते दहा दिवसांत खरेदी केंद्र सुरू होतील. कांद्याला योग्य तो भाव दिला जाईल. आम्ही प्रथमच मधली साखळी तोडून शेतकऱ्यांच्या खात्यावर कांद्याचे पेमेंट व्यवहार झाल्यानंतर आठ दिवसांत अदा करणार असल्याचे सांगितले.
सुनीलकुमार सिंग म्हणाले की, देशाला लागणारा ८० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून मिळतो. त्यामुळे येथील कांदा उत्पादकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो तेव्हा आम्हास इतर राज्यातील शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागतो. किरकोळ बाजारातील भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार असल्याचा दावादेखील सुनील सिंग यांनी केला.
पोर्टलद्वारे करावी लागणार नोंदणी
■ एनसीसीएफ अथवा नाफेडला कांदा द्यायचा असेल तर यंदा प्रथमच शेतकऱ्यांना पोर्टलद्वारे आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच अधिकृत पोर्टल, वेबसाइट कळविले जाईल. आपल्या हक्काचा कांदा देशभरात कुठे विकायचा हे ठरविण्याचे हेदेखील शेतकरी आता ठरवतील.
कोल्ड स्टोरेजची सोय करणार
■ कांदा जास्तीत जास्त टिकावा यासाठी सरकारी पातळीवर कोल्ड स्टोरेजची सोय केली जाईल. नाशिक जिल्ह्यात यासाठी माहिती गोळा करण्याचे काम सरू असून, बाजारभावाप्रमाणे कांद्याला भाव दिला जाईल, अशी माहिती देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.