Join us

कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

By बिभिषण बागल | Published: August 12, 2023 8:00 AM

सदर परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील.

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी "आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा-२०२३ (Ph.D-CET- 2023)” महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांचे मार्फत संभाव्य दि. २९.१०.२०२३ रोजी महाराष्ट्रातील सहा केंद्रीवर आयोजित करण्यात येत आहे.

सदर परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. सदर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे http://www.mcaer.org या संकेतस्थळावर स्वतः भरावयाचे आहे. अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्याचा कालावधी दि.०८.०८.२०२३ ते दि.२३.०८.२०२३ असा राहील.ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन बँकींग (नेट बँकींग) डेबिट/क्रेडीट कार्डव्दारे दि.०८.०८.२०२३ ते दि. २४.०८.२०२३ (दुपारी १५:००) पर्यंत स्वीकारले जाईल.

ह्या परीक्षेसंबंधित अर्ज महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांच्याकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. संभाव्य पात्र व अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी दि. ३१.०८.२०२३ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांनी आपले परीक्षा प्रवेश पत्र सदरील संकेतस्थळावरुन दि. १७.१०.२०२३ पासून प्रिंट काढून उपलब्ध करुन घ्यावयाचे आहेत.

सदर सामाईक प्रवेश परीक्षेचा परीक्षेचा निकाल संभाव्य दि.०८.११.२०२३ रोजी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे http://www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच, सदर परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे संबंधित संकेतस्थळावर अधिसुचित करण्यात येईल.

या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२५५२८५१९ / ०२०-२५५२८११९ या दुरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असे नियंत्रक, महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळ, पुणे यांचे कार्यालयाव्दारे कळविण्यात आलेले आहे. 

टॅग्स :शिक्षणशेतीशेती क्षेत्रशेतकरीविद्यापीठसरकार