Join us

कांद्याच्या आगारात भरणार ज्वारीची कोठारे, नाशिक जिल्ह्यात रब्बीची फक्त 45 टक्के पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:45 AM

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातून सावरत आतापर्यंत रब्बीची पेरणी फक्त 45.42 टक्के झाली आहे.

दिनेश पाठक

नाशिक : खरीप हंगामात बळीराजाला फटका बसला, त्यातून तो सावरत असताना रब्बीची पेरणी मात्र जिल्ह्यात आज अखेर फक्त 45.42 टक्के झाली आहे. कोरडे पडलेले जलस्रोत, उशिराच्या पावसाने लांबलेला शेती हंगाम यामुळे यंदा पेरण्यांना फटका बसला. सरासरी 13 हजार 576 पैकी प्रत्यक्ष पेरणी 51 हजार 584 हेक्टर इतकीच झाली आहे.

पेरण्यांची आशा आता मावळली आहे. 30 टक्के भागात तर शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. ज्वारीने मात्र शेतशिवार फुलले आहे. हक्काचे पाणी आहे त्या ठिकाणी अजून जेमतेम 10 टक्के पेरण्या वाढू शकतील. त्यामुळे यंदा खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असेच चित्र आहे, केंद्रीय कृषी पथक नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले होते. अवकाळीने झालेले नुकसान, घटलेले पाण्याचे स्रोत, कांद्याची झालेली कमी लागवड अन् भविष्यातील उपाययोजनांचा आढावा समितीने घेतला. सोबतच रब्बीतील लागवडीची माहितीही घेतली. जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करता आली नव्हती. जुलैच्या अखेर 30 टक्के म्हणजे 32 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, जुलै अन् ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. नंतर सप्टेंबरमध्ये यंदाचा सर्वाधिक पाऊस झाला. त्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला. एकंदरीतच या सर्व बाबींचा परिणाम रब्बीवर यंदा झाला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यावर 80 टक्के पेरण्या झाल्या होत्या. या वर्षी मात्र फक्त 45.42 टक्के झाल्या आहेत. कमी पावसाने कांदा लागवडही कमी झाली.

यंदा कांद्याला ज्वारी भारी पडली

नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून देशभर परिचित आहे. मात्र, यंदा कांद्याला ज्वारी भारी पडली आहे. कमी पाऊस झाला असला तरी 145.34 टक्के इतकी ज्वारीची पेरणी 15 डिसेंबरअखेर जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे ज्वारीची कोठारे यंदा भरणार आहेत. लागवड वाढल्याने ज्वारीचे दरही आवाक्यात असतील. जिल्ह्यात 64 हजार 150 हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार होता. मात्र, फक्त 22 हजार 552 हेक्टरवर लागवडीने जेवणातील पोळीही यंदा महाग होईल, कळवण अन् पेठ तालुक्यात प्रत्येकी 57 टक्के गव्हाच्या पेरण्या झाल्या असून, बाकीचे तालुके त्याखालोखालच आहेत.

फक्त 45 टक्केच पेरणी 

दरम्यान जिल्हाभरात हजार 86 पैकी 15 हजार 675 हेक्‍टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आले आहे तर नांदगाव तालुक्यात ज्वारीची जवळपास 308 टक्के अधिक लागवड करण्यात आले आहे तर निफाड तालुक्यात सर्वाधिक 167 टक्के मक्याची लागवड करण्यात आली आहे तर 15 डिसेंबर अखेर रब्बी पिकांची त्यांनी किती झाली हे पाहुयात मालेगाव तालुक्यात 17 टक्के 42 टक्के बागलाण तालुका 41 टक्के कळवन 67 टक्के, देवळा 15 टक्के, नांदगाव 38 टक्के, सुरगाणा 53 टक्के, नाशिक 40 टक्के, त्र्यंबकेश्वर 36 टक्के, दिंडोरी 58 टक्के, इगतपुरी 68 टक्के, पेठ 45 टक्के, निफाड 41 टक्के, सिन्नर 56 टक्के, येवला 42 टक्के, तर चांदवड 51 टक्के अशी जवळपास एकूण सरासरी 45 टक्के रब्बीची पेरणी झाली आहे.

टॅग्स :शेतीनाशिकपीकगहू