पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतीसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातपाणीसाठा खूपच कमी आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. धरण साखळी क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाणीसाठा खूपच कमी आहे. उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसह सोलापूर, बारामती, इंदापूर येथील औद्योगिक वसाहतींसह पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील शहरांनाही उजनीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले होते.
धरणसाखळीत काही प्रमाणात पाऊस पडल्याने दि. १ ऑगस्ट रोजी मृत पाणीसाठ्यातून उपयुक्त्त साठ्यात पाणीपातळी आली. दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता धरणात ७०.७० टीएमसी एवढा पाणीसाठा, तर धरणात १३.१४ टक्के, ७.४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून उजनी धरणसाखळीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवकही घटली आहे.
उजनी धरण परिसरात पाऊस कमी असला तरी पुणे परिसरातील धरणसाखळीतील पावसावर भीमा नदीवाटे उजनी धरण शंभर टक्के भरते. यंदाच्या पावसाळ्यात धरणसाखळीत पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे धरणसाखळीतील छोटी-मोठी धरणे भरल्यानंतरच पाणी उजनी धरणात पोहोचणार आहे. उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसी, तर १११ टक्के अधिकतम पाणीसाठवण क्षमता आहे. ११७ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर १०० टक्के धरण भरते, तर ६३ टीएमसीपर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा असतो. नंतर ते वजा पातळीवर जाते. दि. ६ मे पासून पाणीसाठ्याची उलटीगणती सुरू होऊन, दि. ९ जुलै रोजी ४४.२७ टीएमसी म्हणजेच वजा ३६.१९ पर्यंत पाणीसाठा पोहोचला होता. दि. २० जून ते ९ जुलैपर्यंत आषाढी वारीसाठी व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडल्यानंतर उजनी धरणात सर्वात कमी ४४.२७ टीएमसी, तर वजा ३६.१९ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचला होता.
उजनी धरणातील पाण्याची स्थिती
१७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ६ वाजता उजनी धरणाची एकूण पाणीपातळी ४९१.९९५ मीटर असून एकूण पाणीसाठा ७०.७० टीएमसी एवढा होता. यात आता केवळ ७.४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा राहिला असून केवळ १३.१४ % पाणी उजनी धरणात उरले आहे. ९२५ क्युसेक पाणीसाठा दौंड वरून विसर्ग करण्यात आला आहे.