कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखात्यात एमडी ड्रग्जचे उत्पादन करून त्याचा देश-परदेशात पुरवठा होत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. त्याच वेळी पुरंदरमधील कोडीत गावात चक्क कांदा आणि शेवंतीच्या शेतात अफूचे उत्पादन घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही घटना उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दशरथ सीताराम बडधे (वय ६५) व तान्हाजी निवृत्ती बडधे (६९, रा. कोडीत, पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कोडीत येथे शेतात अफूची लागवड केली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता कांदा व शेवंतीच्या फुलांच्या शेतीआड अफूची लागवड केल्याचे आढळून आले. या शेतातून १० किलो ५०० ग्रॅमची अफूची ओली बोंडे पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.