Join us

पाणी सोडण्यास विरोध अन् आर्थिक फायद्यासाठी मराठवाड्याचा ऊस नेण्याचा दुहेरी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:41 AM

११ साखर कारखान्यांना जातो जिल्ह्यातून १२ लाख टन ऊस

बापू सोळुंके

मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे तब्बल ११ साखर कारखाने पैठण आणि गंगापूर तालुक्यातील उत्पादित उसावर चालतात. सुमारे १२ लाख टन ऊस है कारखाने नेतात. केवळ राजकीय फायद्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करायचा आणि आर्थिक फायद्यासाठी मराठवाड्यातून ऊस न्यायचा; असा दुहेरी खेळ हे राजकारणी खेळत आहेत. 

जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये, यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी शासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. समन्यायी पाणी आहे. वाटप तत्त्वानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असेल तर या धरणाच्या ऊर्ध्व भाग असलेल्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील समूह धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. 

मराठवाड्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी आ.शंकरराव गडाख यांचा सोनई साखर कारखाना आणि कोल्हे यांचा संजीवनी साखर कारखाना आहेत. भेंडा साखर, केदारेश्वर साखर, गंगामाई साखर, कोपरगाव साखर, गंगासागर साखर, संगमनेर साखर, नगर तालुका साखर, कुकडी साखर, वृद्धेश्वर साखर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

गंगापूर आणि पैठण तालुक्यातून किमान दहा ते बारा लाख टन ऊस नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जातो. जायकवाडीच्या पाण्याला राजकीय स्वार्थापोटी विरोध करायचा आणि आर्थिक फायद्यासाठी मात्र ऊस न्यायचा असा दुहेरी खेळ राजकारणी साखरसम्राट खेळत आहेत. पाणी सोडण्यास विरोध करणाच्या कारखान्याने एक तर मराठवाड्यातील उसाला हात लावू नये आणि पैठण आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस देऊ नये, असे आपले आवाहन आहे.- जयाजीराव सूर्यवंशी, संस्थापक, अन्नदाता शेतकरी संघटना

८.६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचा आदेश•  या निर्णयानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी मराठवाड्यासाठी गोदापात्रात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले.

• या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील ११ साखर कारखाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उसावर चालत असल्याचे ते विसरल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :साखर कारखानेमराठवाडाजायकवाडी धरणऊस