Oraganic Sugarcane : उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढावे, यासाठी कळंब तालुक्यातील रांजणी नॅचरल शुगरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात एफओएम किंवा किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन सुरू केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कौशल्य विकास उपायुक्त विद्या शितोळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नॅचरलचे प्रमुख बी. बी. ठोंबरे, संचालक ज्ञानेश्वर काळदाते, संचालक पांडुरंग आवाड, हर्षल ठोंबरे, जनरल मॅनेजर यु. डी. दिवेकर
उपस्थित होते.
सद्यःस्थितीत गुरांची संख्या घटल्याने शेणखतासारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झालीय. जमिनीचा पोत अबाधित ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याची कृषि विद्यापीठे शिफारस करतात, मात्र याची उपलब्धता नसल्याने शेतकरी फक्त रासायनिक खतांचा वापर करतात.
परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होत आहे व जमिनी क्षारपड होत आहेत. यास्थितीत जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे.
यासाठीच 'नॅचरल'कडून आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात एफओएम किंवा किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन सुरू केले आहे. हे खत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे, हे विशेष.
फर्मेंटेड ऑरगॅनिकची मात्रा...
सेंद्रिय खते उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्राने किण्वन प्रक्रिया केलेले सेंद्रिय (एफओएम) खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना खत पुरवठादार कंपन्यांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नॅचरलने सीएनजी प्लांटमध्ये तयार झालेले व किण्वन प्रक्रिया केलेले सेंद्रिय खत अर्थात फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर (एफओएम) उत्पादित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
उसाला जे-जे हवं, ते-ते यात...
रांजणीच्या नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज समूहात दररोज शंभर टन फर्मेटेड ऑरगॅनिक मॅन्युअर अर्थात किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खतांचे उत्पादन होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. उसाच्या वाढीसाठी जे जे घटक आवश्यक असतात, ते सर्व घटक यात समाविष्ट असणार आहेत.
एकूणच उसाची वाढ तर होणार आहेच, शिवाय शेतकऱ्यांसाठी काळी आई असणाऱ्या जमिनीचा पोत अबाधित राहून ती कायम उत्पादनक्षम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा वापर वाढवावा, असे 'नॅचरल'चे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी 'लोकमत ऍग्रो' शी बोलताना सांगितले.