Orange Export :
'नागपुरी संत्रा' नावाने जगात ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातून संत्र्याची निर्यात वर्षागणिक वाढण्याऐवजी मंदावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात संत्रा विकावा लागत असून, दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया उद्योग, ग्रेडिंग कोटिंग सेंटर, निर्यात सुविधा केंद्र, कार्गो प्लेन यासह इतर मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. याला स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते आणि शासकीय स्तरावरील उदासीनता कारणीभूत आहे, असा आरोप संत्रा उत्पादकांनी केला आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण ३५ हजार हेक्टरवर उत्पादनक्षम संत्रा बागा आहेत. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २ लाख २५ हजार टन संत्राचे उत्पादन होत असून, यात ६२ टक्के अंबिया आणि २८ टक्के मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. यात ४५ टक्के फळे ही निर्यातक्षम असतात. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी नरखेड, काटोल, कळमेश्वर आणि सावनेर या चारच तालुक्यांमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते.
वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे बागांवर विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात एकही संत्रा प्रक्रिया प्रकल्प नाही. नेत्यांकडून संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले जाते आणि ते वेळीच हवेत विरले जाते.
निर्यातीसाठी संत्रा ग्रेडिंग-कोटिंग सेंटर व निर्यात सुविधा केंद्रांची नितांत आवश्यकता असताना या सुविधाही सरकारने अद्याप तयार केलेल्या नाहीत. नागपूर शहरात कार्गो प्लेन व रेफर कंटेनर सुविधा उपलब्ध नाही. संत्रा निर्यात करावयाचा झाल्यास मुंबईहून रेफर कंटेनर मागवावे लागतात आणि ते पॅक करून पुन्हा मुंबईला ट्रकद्वारे पाठवावे लागतात. या सर्व वेळ खाऊ प्रक्रियेत बराच वेळ जात असलेल्या नाशवंत असलेल्या संत्र्याची अवस्था काय होते, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना अद्याप झाली नाही.
संत्र्याची निर्यात ६१ हजार टनांवरनागपुरी संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात केली जात असून, थोडीफार दुबईमध्ये केली जाते. वर्ष २०१८ पर्यंत बांगलादेशात दरवर्षी सरासरी २ लाख २५ हजार टन संत्रा निर्यात केली जात होती.बांगलादेशने संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने व त्यात वर्षागणिक वाढ केल्याने ही निर्यात आता ६१ हजार टनांवर आली आहे. संत्र्याची निर्यात वाढवून डॉलर कमावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीही उपाययोजना करायला तयार नाही.
संत्र्याचे लागवडी क्षेत्र किती? तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)नरखेड १४ हजार काटोल १२ हजारकळमेश्वर ६ हजारसावनेर ३ हजार
संत्रा आयातदार देश शोधासध्या बांगलादेश व दुबई या दोन देशांत संत्र्याची निर्यात केली जाते. केंद्र व राज्य सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास नागपुरी संत्र्याची चीन, आखाती देश, श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि युरोपातील काही राष्ट्रांमध्ये संत्र्याची निर्यात केली जाऊ शकते. त्यासाठी मूलभूत सुविधांची निर्मिती करून सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.
संत्रा निर्यात करायचा झाल्यास सरकारने काही पायाभूत सुविधांची निर्मिती करून देणे, संत्र्याच्या दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादनासाठी सिट्रस इस्टेटला बळकटी देणे, निर्यातीसाठी सुविधा पुरविणे आणि संत्र्याला राजाश्रय देणे अत्यावश्यक आहे. संत्र्याच्या निरोगी व दर्जेदार कलमे तयार करणे तेवढेच गरजेचे आहे.- मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक, काटोल.
विशिष्ट आंबट-गोड चवीमुळे नागपुरी संत्र्याला जगात चांगली मागणी आहे. लिंबूवर्गीय फळांच्या जागतिक बाजारपेठेत नागपुरी संत्र्याला स्थान मिळवून देणे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी काही मूलभूत बदल व सुधारणा करणे आवश्यक आहे.- मिलिंद शेंडे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.