संत्र्याच्या आंबिया बहराचे सौदे मध्यात आले असून फळाची तोड व्हायची असताना सौदा करतेवेळी व्यापारी शेतकऱ्याकडून दहा ते वीस टक्क्यांपर्यंत सूट घेऊन शेतकऱ्यांकडून मोफत माल नेत असल्याचे दिसून येत आहे. संत्र्याला २२ हजार ते २५ हजार प्रति टनापर्यंत भाव आहे.
संत्रा व्यापारी थेट शेतात येऊन शेतकऱ्याशी सौदा शेतातच करतात. यावेळी अलिखित करार करून दहा टनावर वायुभार, कोळशीच्या नावावर चक्क एक टन वजनात काट करून मोफत संत्री शेतकऱ्याकडून नेत असल्याचा प्रकार घडत आहे.
वरुड मोर्शीची संत्री ही जगभर प्रसिद्ध आहेत. येथील आंबट गोड संत्र्याला देशभरातून मागणी आहे. संत्रा हंगाम मध्यात असूनही अजूनपर्यंत पाहिजे त्याप्रमाणात भाववाढ झालेली नाही. संत्रा बागेत झाडाला फलधारणापासून ते परिपक्व होईपर्यंत ११ महिन्यांचा कालावधी लागतो. यावेळेत शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे संत्रा झाडे जपतात.
परंतु विविध कीटकनाशके, बुरशीनाशके, निविष्ठा वापरूनही अतिवृष्टी, अनैसर्गिक फळगळीमुळे शेतकरी संकटात आहे. अशातच व्यापारी शेतकऱ्यांना वाटेल तसे लुटत असून याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही समजत नसल्याचे दिसून येत आहे.
यातील काही शेतकरी बाजार समितीच्या आवारात विक्रीस नेतात. तेथेही राजरोसपणे अलिखित कराराप्रमाणे व्यापारी दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून मोफत घेतात. शेतकऱ्यांना सौद्यापेक्षा जास्त माल द्यावा लागतो. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी या संदर्भात नेमकी तक्रार कुणाकडे करावी याची माहिती शेतकऱ्यांना नाही. दुसरीकडे वायुभाराचा व्यवहार गैरकायदेशीर व बाजार समितीच्या मान्यतेविना चालतो.
शेतकऱ्याकडून दहा टक्के मोफत (काट) घेतल्यानंतरही बारीक फळे बाहेर काढून फेकली जातात. यातही शेतकरी नागवला जातो. दहा टक्के माल मोफत दिल्यावर वजनाची कपात करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते.
शेतकऱ्याची बाजार समितीच्या मूक संमतीने व्यापारी लूट करीत आहे. प्रतिटन एक क्चेिटल सूट घेऊनही लहान आकाराची फळे शेतकऱ्यांना बांधावर फेकावी लागतात. शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. - राजाभाऊ गुडधे, संत्रा उत्पादक शेतकरी, अमडापूर (राजुरा बाजार अमरावती).
हेही वाचा : Bajari Health Benefits : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे विविध आरोग्यदायी फायदे