नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक (Orange Fruit) शेतकऱ्यांसाठी पतंजली फूड-हर्बल पार्क वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या संत्र्याच्या दर्जेदार कलमा तयार करण्याकरिता पतंजली आणि राज्य सरकार संयुक्तपणे आधुनिक नर्सरी उभारेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान परिसरातील पतंजली फूड-हर्बल पार्कचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पतंजली आयुर्वेद समूहाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, कंपनीचे संचालक रामभरण, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष त व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सहव्यवस्थापकीय संचालक आणि मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, प्रकल्पात संत्र्याची ग्रेडिंग आणि साठवण होईल. कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आहे. रोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होईल. पार्कचे भूमिपूजन ९ वर्षापूर्वी करण्यात आले. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या, तरीही न डगमगता त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. (Orange Fruit)
पतंजली उद्योग समूहाला नागपुरात मिहानमध्ये आमंत्रित केले, त्याचवेळी विविध राज्यातून या समूहाला त्या त्या राज्यांमध्ये उद्योग उभारण्यास बोलावण्यात आले. मात्र, मिहानमध्येच हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प घेऊन व राज्य सरकारच्या रितसर निविदा प्रक्रियेचा अवलंब करून आज हा प्रकल्प उभा राहिला. (Orange Fruit)
रोजगार व संत्र्याला बाजारपेठ मिळणार
गडकरी म्हणाले, प्रकल्पात दररोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत्रा पुरविण्यासाठी विदर्भात संत्र्याचे एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे.
प्रकल्पामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. स्पेनच्या एकरी ३०० झाडांच्या तुलनेत नागपुरात एकरात केवळ १०० झाडे असतात.
स्पेनमध्ये एकरी ३० ते ३५ टन तर विदर्भात केवळ ४ ते ५ टन संत्र्याचे उत्पादन होते. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढविणे शक्य आहे, असे गडकरी म्हणाले.
इतर राज्यांमधूनही संत्रा खरेदी करू
बाबा रामदेव म्हणाले, प्रकल्पात दररोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होईल. एवढ्या संत्र्याचा पुरवठा विदर्भातील शेतकऱ्यांकडून होणे शक्य नाही. त्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान आणि अन्य राज्यातूनही संत्रा प्रक्रियेसाठी आम्ही खरेदी करू. विदर्भात एकरी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न राहील. हा प्रकल्प म्हणजे कृषी क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. (Orange Fruit)
देवेंद्र मुख्यमंत्री झाले, आता उद्घाटनाला या!
फडणवीस म्हणाले, प्रकल्पाला उशीर का झाला, हे नंतर माझ्या लक्षात आले. देवेंद्र मुख्यमंत्री बनतील, तेव्हाच मी प्रकल्पाचे उद्घाटन करेल, असे बाबांना वाटत असेल. त्यामुळेच बाबांनी दोन वर्षांचा वेळ काढला. आता मुख्यमंत्री बनले, उद्घाटनाला या, असे बाबांना वाटले असेल. याकरिता मी बाबा रामदेव यांचे आभार मानतो. (Orange Fruit)