गेल्या दोन वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागत आहे. त्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. दुसरीकडे अनुदानासाठीही शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुका बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. पण अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तालुक्यातील काही गावांत मृग बहाराचा संत्रा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. रसाळ व गोड संत्री असल्याने या संत्र्यांना राज्यासह विदेशात मोठी मागणी आहे. उत्पादन चांगले येत असल्याने परिसरात अल्पभूधारक असो अथवा मोठा शेतकरी असो या शेतकऱ्यांनी पूर्णतः शेती संत्रा बागेत गुंतवली.
गत दोन वर्षांपासून या भागात मृगाचा पाऊस वेळेत दाखल झाला नाही. त्यामुळे संत्रा बहार अपेक्षेप्रमाने आलाच नाही. त्यातही ऐन काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठे नुकसानही झाले. त्यात गतवर्षी संत्र्यांवर आयात शुल्क लावले गेले. परिणामी संत्रे महाग झाले.
किंमती वाढल्याने ग्राहक मिळणे कठीण झाल्याने आयात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना चांगला भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
चुकीच्या धोरणाचा फटका
शासनाचे अनुदान बागायतदार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. पण ते वेळेवर मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई तक्रारी करूनही मिळत नाही. अस्मानी संकटासोबत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसत असल्याने संकटांची मालिका काही संपत नसल्याचे चित्र दिसून येते.
व्यापारीही भाव पाहून संत्रा खरेदी करू लागले
काही वर्षांपासून व्यापारी भाव पाडून संत्र्यांची खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. गतवर्षीची तूट यंदाच्या हंगामात भरून निघेल, असे शेतकऱ्यांनी नियोजन आखले होते. मात्र यंदा ऐन बहाराच्या वेळेला पावसाने दांडी मारल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी संत्रा शेतकऱ्यांची बाजू शासनापुढे मांडावी, आयात शुल्क कमी करावे. - कामाजी सिद्धेवार, शेतकरी.
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांनी केली आहे. पण म्हणावे तसे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक शेतकऱ्यांनी संत्र्यांची लागवड केली आहे. - अशोक तम्मेवार, शेतकरी.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा
कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. शासनाच्या योजनाही शेतकऱ्यांना सांगितल्या जातात. संत्रा लागवडीसाठी अनुदान आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. - सुनील भिसे, तालुका कृषी अधिकारी, वसमत.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी