लातूर तालुक्यातील बोरगाव काळे व परिसरात सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळबाग लागवड केली आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने सध्या भाजीपाला व फळ पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सिंचनाची सुविधा असणाऱ्या तुरळक शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने भाजीपाला व फळबाग लागवड केली आहे. या भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाला व फळवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामुळे भाजीपाला व फळ पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे; परंतु सद्यस्थितीत तापमान दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे सरकत असल्याने भाजीपाला व फळ पिकावर वाढत्या उष्णतेचे संकट घोंघावत आहे. भाजीपाला पिकांना भरपूर प्रमाणात पाणी दिले तरी उच्च तापमानामुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे.
त्यामुळे भाजीपाला जोपासणे अवघड झाले आहे. सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतात वांगे, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला असून काही शेतकऱ्यांनी पेरू, डाळिंब, चिकू आदी फळबाग लागवड केली आहे. त्याचबरोबर भुईमूग, ऊस व तुतीची पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. या पिकांनाही उन्हाचा फटका बसत आहे. भाजीपाला व फळबाग अति उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस माना टाकत असून, काही ठिकाणी करपून जात आहे. त्यामुळे भाजीपाला, फळ लागवड केलेला शेतकरी संकटात आहे
बोअरवेल, विंधन विहिरी कोरड्याठाक
* बोरगाव काळे परिसरातील मागील तीन महिन्यांपासून विहीर, बोअरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिकांना जगविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अति उष्णतेमुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे.
अनेकांच्या पालेभाज्या सुकून जात आहेत. तीव्र स्वरूपाच्या उन्हाळ्यात स्थानिक पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे बाजारातील आवक काही प्रमाणात घटली असून, दरही वाढले आहेत. सद्यस्थितीत एक एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली आहे. पाण्याची कमतरता आणि वाढती उष्णतेमुळे भाजीपाला व फळबागा सुकत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे पेरू उत्पादक शेतकरी जोतीराम ढोले, अप्पासाहेब काळे यांनी सांगितले
फळबागांना कसे वाचवाल?
सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी शेतकर्यांनी 40 मायक्रॉनचे पॉलिथिन फळबागांसाठी मल्चिंग (आच्छादन) म्हणून वापरले आहे. काही ठिकाणी काडीकचरा, गव्हाचे कांड, भुसा, पालापाचोळा आदींचा वापर आच्छादन म्हणून केलेला आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा गढूळ, कचरायुक्त व क्षारयुक्त असल्याचे बर्याच ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात ठिबक संचामध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
1. काही ठिकाणी संचामध्ये गळती असेल तर दाब (प्रेशर) कमी झाल्याचे चटकन लक्षात येते. अशावेळी ताबडतोब गळती शोधून त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती केली पाहिजे. आपल्या बागेत कोणती फळझाडे आहेत, त्यानुसार ठिबक संचाच्या ड्रीपरची निवड केली पाहिजे. मोसंबी, संत्रा, पेरू, आंबा व डाळिंब या पिकांसाठी ‘ऑनलाईन ड्रीपर’ तर केळी, पपई, ऊस, पालेभाज्या इत्यादींसाठी ‘इनलाईन ड्रीपर’ वापरले पाहिजे. सपाट शेतजमिनीसाठी साधे ‘ऑनलाईन’ तर चढउताराच्या जमिनीसाठी ‘प्रेशर कॉम्पेनसेटेड ड्रीपर’ वापरले पाहिजे. मुरमाड व वाळूमिश्रित जमिनीसाठी ‘मायक्रोस्पेअर’चा वापर करावा.
अधिक माहितीसाठी हे वाचा-
काळजी नको, दुष्काळात फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ चार गोष्टींचा अवलंब करा