२१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड असणाऱ्या जालना जिल्ह्यातील ४१ मंडळांत पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वेक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांची स्थिती गंभीर आहे. पावसाचा खंड असलेल्या गावातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शासन निर्णयानुसार २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड असणाऱ्या मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याची तरतूद आहे. यानुसार जिल्ह्यातील ४१ मंडळांतील सोयाबीन, कापूस आणि मका पिकाचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी, शेतकऱ्यांचा समावेश आहे. २६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या मंडळांचा समावेश
भोकरदन तालुका- भोकरदन, सिपोरा, धावडा, अन्वा, पिंपळगाव, हसनाबाद, राजूर, केदारखेडा. जाफराबाद तालुका जाफराबाद, माहोरा, कुंभारझर, टेंभुणी, वरुड. जालना तालुका- जालना ग्रामीण, वाघरूळ, नेर, सेवली, विरेगाव. अंबड तालुका अंबड, धनगर पिंप्री, जामखेड, रोहिलागड, गोंदी, वडीगोद्री, सुखापुरी, परतूर तालुका- परतूर, वाटूर, आष्टी, सृष्टी, बदनापूर तालुका- सेलगाव, बावणेपांगरी. घनसावंगी तालुका- घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली, रांजणी, जांबसमर्थ, मंठा तालुका मंठा, तळणी, ढोकसाळ, पांगरी गोसावी या मंडळांचा समावेश आहे.