वाशिम जिल्ह्यातील ७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभाग नोंदवत नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या शेतीची कास धरली आहे. याअंतर्गत १७ हजार एकरपेक्षा अधिक शेती विषमुक्त पिकांच्या लागवडीखाली आली आहे.
गेल्या काही वर्षांत शेतजमिनीत रासायनिक खत आणि प्रक्रिया केलेल्या बियाणांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रसायनांचा प्रवेश झाला. यामुळे जमिनीचा कस बिघडण्यासोबतच मानवी शरीरावरही विपरीत परिणाम होत आहे.
त्यामुळे नैसर्गिकरीत्या पिकणारी शेती करणे काळाची गरज आहे. ही बाब पटल्याने ७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरल्याची माहिती 'आत्मा'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी दिली.
विषमुक्त शेती काळाची गरज
• रासायनिक खताच्या वापराने पिकविल्या जाणाऱ्या अन्नधान्यातील घटक विविध आजार व विकारास कारणीभूत ठरत आहेत.
• त्यामुळे सकस आणि जीवनसत्वयुक्त आहार मिळण्यासाठी विषमुक्त शेतीची कास धरणे काळाची गरज आहे.
गतवर्षी तयार झाले ७० शेतकरी गट
• डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत गतवर्षी मंगरूळपीर तालुक्यात २० आणि अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी १० असे ७० शेतकरी गट तयार झाले आहेत.
• प्रत्येकी ५० शेतकऱ्यांच्या या गटांनी नैसर्गिक शेतीचा प्रयोग पूर्णतः यशस्वी करून दाखविला आहे.
शेतकरी गटांना 'आत्मा'कडून प्रशिक्षण
नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यात गतवर्षी स्थापन झालेले ७० आणि चालु वर्षी तयार केल्या जात असलेल्या शेतकरी गटांमधील सदस्य शेतकऱ्यांना 'आत्मा' कडून शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात दशपर्णी अर्क, निबोळी अर्क, जीवामृत तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. उत्पादीत सेंद्रीय माल विक्री करण्यासाठी देशातील विविध कंपन्यांसोबत करार केला जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी दिली.
पारंपरिक पद्धतीला दिले जातेय प्राधान्य
नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभागी शेतकरी गटांकडून पारंपरिक पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. याअंतर्गत दशपर्णी अर्क, जिवामृत, निंबोळी अर्क, घन जिवामृत, बुरशीनाशक स्वतःच तयार करून पिकांची काळजी घेतली जात आहे.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी