Pune : "शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा अतिवापर केल्यामुळे अन्नसाखळी बिघडली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात येत चालले आहे. रोज विष पोटात जात आहे. कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढले आहेत. यावर उपाय आणि नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जे अन्न खातो ते अंशमुक्त, रसायनमुक्त असायला हवे, त्यासाठीचे नियंत्रण निर्माण केलं पाहिजे." असे मत राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.
कृषी महाविद्यालय पुणे येथे आयोजित फुले कृषी महोत्सव २०२५ येथे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने व कृषी संचालक अशोक किरन्नळी, रफिक नाईकवाडी व इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.
कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच स्मार्ट प्रकल्पानंतर्गत आणि डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनांचे स्टॉल ची पाहणी त्यांनी केली. नैसर्गिक शेती पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला शहरी भागात या निमित्ताने संधी उपलब्ध करून देण्यात आली तसेच शेतकरी उत्पादनाच्या पुढे जाऊन संघटित होऊन त्यांच्या मालाचे प्राथमिक प्रक्रिया करून व्यावसायिक कंपनी स्वरुपात काम करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
यामधे सहभागी झालेल्या नाशिक च्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीची उत्पादने, सेंद्रिय, श्री धान्ये उत्पादने, भौगोलिक मानांकन प्राप्त निर्यातक्षम उत्पादने पाहून समाधान व्यक्त केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांना यापुढे कृषि विभागाच्या शक्य त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिकाही त्यांनी मांडली.
"प्रत्यक्ष पाहिले तर नक्कीच विश्वास बसतो म्हणून पोकळ प्रचार करण्यापेक्षा कृषि विद्यापीठाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून निर्माण केलेले शाश्वत शेतीवर आधारित असे तुलनात्मक प्रयोग शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना निश्चितच योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळेल. कोणत्या प्रकारचं उत्पादन घेणे आवश्यक आहे आणि मार्केट साठी कोणते उत्पादन योग्य आहे याबाबतीतील योग्य मार्गदर्शन घेतले तर घेणाऱ्याला योग्य माल मिळेल आणि देणाऱ्याला योग्य मोबदला मिळेल. शेतकऱ्यांनी केवळ सेंद्रीय शेतीवर शिफ्ट होणे गरजेचे नाही तर सेंद्रीय शेती करण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विद्यापीठातलं तंत्रज्ञान आणि कृषि विभागाच्या माध्यमातून विस्तार प्रशासन यांचा सुवर्णमध्य साधला तर निश्चितच याचा सर्वांना फायदा होईल" असेही राज्याचे कृषी आयुक्त म्हणाले.