हवामान विभागाने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय उपाययोजना आवश्यक असल्याचे मत सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी व्यक्त केले.
चिंचवडे यांनी सांगितले की, खरीप उशिरा संपल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणीही उशिरा झाली. परिणामी रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक असणारे पोषक वातावरण नव्हते. त्यातच भर म्हणून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या दिवसांत रब्बी हंगामातील पिकांची शाखीय वाढीची अवस्था असल्यामुळे पिकांना थंड वातावरण असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटते. त्याचा परिणाम गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांवर होतो.ढगाळ वातावरण हवेतील दमटपणा वाढतो, त्यामुळे उबदार वातावरण तयार होते. उबदार वातावरणात किडींचा प्रादुर्भाव वाढतो. किडींचे प्रजनन चक्र अधिक लवकर येते.
हरभरा पिकावर घाटेअळीचे सावट आधीपासूनच आहे, त्यात आणखी भर पडू शकते. त्यासाठी निंबोळी आणि बायोमिक्सची प्रत्येकी १० मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन चार- पाच दिवसांच्या फरकाने एकापाठोपाठ फवारण्या शेतकरी बांधवांनी घेणे फायदेशीर राहील.
अशी घ्या पिकांची काळजी
- मका पिकावर देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा वेळी दशपर्णी अर्क आणि ताक अंडी द्रवणाच्या १० मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आलटून पालटून पाच ते सहा दिवसांच्या फरकाने एकापाठोपाठ फवारण्या घ्याव्यात.
- ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहरावरही परिणाम पाहायला मिळतो. अधिक दिवस ढगाळ वातावरण राहिले तर मोहरावर बुरशींचा प्रादुर्भाव होऊन गळून पडू शकतो. अशावेळी ट्रायकोसुडो एकत्रितपणे १० मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारावे, असे सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी सांगितले.
मर रोग ठेवा नियंत्रणात
ढगाळ वातावरण बुरशींच्या वाढीला चालना देते. हरभऱ्यावर फ्युजारियम ऑक्सस्पोरम बुरशीमुळे येणाऱ्या मर रोगाचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. हा मर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी १० ग्राम बायोमिक्स १ लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. जर द्रव स्वरूपात उपलब्ध असेल तर १० मिलि प्रती लिटर या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. स्प्रिंकलरच्या सहायाने एसटीपी पंप किंवा बॅटरीवर चालणाऱ्या पंपाचे नोझल काढून पंपाचा पाईप जॉर्डनरच्या सहायाने स्प्रिंकलरमध्ये जोडावा. बायोमिक्स उपलब्ध झाले नाही तर ट्रायकोडर्मा हा एक चांगला पर्याय आहे.