सुनील काकडे
राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीखाली आणली आहे. हे क्षेत्र २०२७-२८ पर्यंत २५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार असल्याची माहिती मिशनच्या प्रकल्प संचालकांनी दिली.
अकोला हे मुख्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची २०१८ मध्ये स्थापना झाली. पहिल्या टप्प्यात अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत १६ हजार हेक्टर शेतजमीन सेंद्रिय पीक लागवडीखाली आणण्यात यंत्रणेला यश मिळाले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीत राज्यातील २५ लाख हेक्टर शेतजमीन पूर्णतः नैसर्गिक व सेंद्रिय पीक लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असून, आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे; तर पहिल्या वर्षी २ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन प्रत्यक्ष सेंद्रिय पीक लागवडीखाली आली आहे.
नैसर्गिक शेती मिशनचे उद्दिष्टे
■ रासायनिक खत, कीडनाशकांचा वापर थांबवून जमिनीची सुपीकता व मातीचे आरोग्य सुधारणे.
■ रसायनमुक्त, सकस व पोषणयुक्त सेंद्रिय शेतमाल उत्पादित करण्यास प्रोत्साहन देणे.
■ सेंद्रिय शेतमालाची मूल्यसाखळी विकसित करणे.
■ १८,८२० उत्पादक गट आणि १८२५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे.
नागपूर, अमरावती विभागांत सर्वाधिक क्षेत्र
नागपूर आणि अमरावती या दोन विभागांमध्ये सेंद्रिय पीक लागवडीखाली आलेले क्षेत्र तुलनेने सर्वाधिक आहे. नागपूर विभागात अभियानाच्या पहिल्याच वर्षी ४० हजार ८७२ हेक्टर; तर अमरावती विभागात ३० हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती बहरली आहे.
२०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा उपक्रम यशस्वी झाला आहे. - आरीफ शाह, प्रकल्प संचालक, नैसर्गिक शेती मिशन.