गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्यात रासायनिकसह सेंद्रिय खतांच्या अनधिकृत विक्रीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आता मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील एका घरात अवैधपणे साठवणूक केलेला सांगली येथील मिलेनिया ॲग्रो लाइफ या कंपनीच्या सेंद्रिय खताच्या ६०० बॅगचा साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केला. (Illegal storage of organic manure )
या खताच्या विक्रीचा, साठवणुकीचा कुठलाच परवाना संबंधिताजवळ नाही. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या मोठ्या कारवाईची माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय या प्रकरणात अनधिकृत विक्रेत्यावर आतापर्यंत एफआयआरदेखील नाही. त्यामुळे या कारवाईविषयी संशयकल्लोळ वाढला आहे.
खुद्द घरमालकानेच याची माहिती कृषी विभागाला दिल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झालेला आहे. मोर्शी पं. स. चे कृषी अधिकारी राहुल चौधरी, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, तंत्र अधिकारी गुणनियंत्रक संजय पाटील व विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक राजेश जानकर यांनी ८ जानेवारीला हिवरखेड येथील एका घरातून ६०० बॅग साठा सील केला व दोन नमुने काढून येथील प्रयोगशाळेला ८ जानेवारीला पाठविण्यात आले. या नमुन्यांचा अहवाल आठ दिवसांत अपेक्षित असताना १४ दिवसांनंतरही मिळालेला नाही.
या खतांचा साठा केलेला विक्रेता नीलेश श्रीकृष्ण भेले (४४, रा. अंजनगाव सुर्जी) याच्याजवळ खत विक्रीचा तसेच साठवणुकीचा परवाना नाही. शिवाय कंपनीजवळ किरकोळ विक्रीचा परवाना नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीची शक्यता लक्षात घेता प्रकरणात एफआयआर अपेक्षित असताना संबंधितांकडून १४ दिवसांपासून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव आहे. या प्रकाराची कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेणे महत्त्वाचे आहे.
कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी करीत असलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे व त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. हिवरखेड येथील प्रकरणात प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिस तक्रार करण्यात येईल. - प्रमोद लहाने, विभागीय कृषी सहसंचालक
वरिष्ठांना डावलून पथकाची कारवाई
* कृषी विभागाद्वारे कारवाई करण्यापूर्वी प्लॅनिंग केले जाते. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. मात्र पथकाने या कारवाईची एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही.
* संबंधित एसडीओ, एसएओ तसेच विभागीय कार्यालयाचे दोन अधिकारी कारवाईत असताना खुद्द विभागीय सहसंचालकदेखील तब्बल १४ दिवसांपासून या कारवाईपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
* २ नमुने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत पावडर फार्ममध्ये असलेल्या एका नमुन्यात काही घटक कमी असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा साठा सील
* बायो-एफ सुपर ऑरगॅनिक मॅन्युअर (पॅलेट) च्या ४० किलो पॅकिंगमध्ये १०० बॅग
* बाय-एफ ऑरगॅनिक मॅन्युअर (पावडर) ४० किलो पॅकिंगमध्ये ५०० बॅग