सध्या आंब्याच्या झाडाला मोहर लागलेला आहे. परंतु, मागचे काही अनुभव लक्षात घेता हा मोहर गळण्याची समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब्याचा मोहर गळण्याची समस्या सोडविण्यासाठी काही सेंद्रिय उपाययोजना आवश्यक असल्याचा सल्ला सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी दिला.
मोहर गळ होऊ नये म्हणून आंबा पिकासाठी सुरुवातीपासूनच अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आंबा पिकाला साधारणपणे ३ ते ४ वर्षांनी वाणानुसार फळ धरण्यास सुरुवात होते, या कालावधीत झाड चांगले सशक्त बनते.
प्रत्येक झाडाला फुलोरा लागण्याच्या आधीपासून म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपासून दर १५ दिवसांनी जीवामृत आणि वेस्ट डीकम्पोजरची आलटून पालटून आळवणी रिंग पद्धतीने करीत राहावी. याचे प्रमाण अर्धा लिटर प्रति झाड एवढे असावे.
तसेच प्रत्येक झाडाला चांगले कुजलेले शेणखत टाकावे, यासोबतच आंब्याची झाडे अधिक सशक्त बनण्यासाठी, अधिक चांगला मोहर लागण्यासाठी आणि मोहरगळ थांबविण्यासाठी मोहर लागण्याअगोदरच एक फवारणी घेणे आवश्यक असते.
ही फवारणी पोटॅशिअम ह्युमेट, फलुविक अॅसिड आणि वेस्ट डीकम्पोजर एकत्रित करावी. यासाठी प्रमाण प्रत्येकी १० मिली प्रति ३ लिटर पाणी एवढे घ्यावे. मोहर अवस्थेत असताना आंब्याच्या झाडाला पाण्याचा ताण पडणार याची काळजी घ्यावी. परंतु, खोडाजवळ वाफसा परिस्थितीदेखील राहील म्हणजेच पाणी साचून राहणार नाही हेही लक्षात घ्यावे.
आंब्याचा मोहर गळण्यामागची नेमकी कारणे काय आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी-जास्त होणे, तापमानात घट होणे यामुळे आंबा पिकावर बुरशीमुळे भुरी आणि करपा या रोगांचा आणि रसशोषक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो.
या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मोहर लागल्यानंतर पहिली फवारणी पावडर फॉर्ममधील बायोमिक्स १५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि जर लिक्विड स्वरूपात असेल तर १५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन करावी.
यानंतर लेकॅनिसिलियम लेकॅनी आणि ब्युवेरिया बॅसियाना या जैविक बुरशींची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून प्रत्येकी एक फवारणी मोहर अवस्थेत करावी. या फवारणीमुळे भुरी आणि करपा रोगाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते.
रस शोषक किडींचे नियंत्रण कसे कराल?चौथी फवारणी सुडोमोनस फ्लुरोसन्स, बॅसिलस सबटीलस, प्रोटीन हायड्रोलीसीस, ब्युवेरिया-मेटाऱ्हाझीयम-व्हर्टिसिलियम लेकॅनी एकत्र करून ३-५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन करावी. ही फवारणी केल्यामुळे आंबा पिकावर येणारा ताण कमी करता येतो आणि बुरशीजन्य रोगांवर आणि रस शोषक किडींवर नियंत्रण मिळवता येते.
फवारणी करीत असताना एचटीपी पंपाचा वापर करावा, अशा पद्धतीने उपाययोजना केल्या तर नक्कीच आंब्याचा मोहर गळ थांबविण्यास मदत होते, असे सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी सांगितले.