Organic Onion Cultivation : शेतकऱ्यांचा सेंद्रीय कांदा लागवडीकडे कल वाढताना दिसत आहे. या मागील उद्देश असा की, जमिनीची सुपीकतेबरोबरच हानिकारक रसायनांपासून मुक्त असलेल्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. शिवाय या कांद्याला बाजारात अधिक मागणी आहे. आणि दरही चांगला मिळतो आहे.(Organic Onion Cultivation)
शेलूबाजार व परिसरातील लाठी, हिरंगी, नागी, तपोवन, इचा, येडशी आणि चिखली या गावांमध्ये यंदा बिजवाई कांद्याची तब्बल २५२ एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कांद्याचा सध्याचा बाजारभाव सुमारे ५० हजार रुपये क्विंटलपर्यंत असून, शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातून मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः नागी गावातील ३२ एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड(Organic Onion Cultivation) केली असून, या कांद्याला बाजारात अधिक मागणी आहे. दरम्यान, कांदा काढणीस येण्याच्या काळात वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. मागील ४ ते ५ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.
पारंपरिक पिकांबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी बिजवाई कांदा शेतीची कास धरुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. पारंपरिक पिकांबरोबरच आम्ही बिजवाई कांदा लागवड करतो. सेंद्रिय कांद्याच्या लागवडीमुळे या भागातील कांद्याला वेगळी ओळख मिळत आहे.- रमेश देवळे, शेतकरी, नागी.
कोणत्या गावात किती क्षेत्रावर लागवड ?
गाव | लागवड क्षेत्र (एकर) |
लाठी | ६० |
हिरंगी | १० |
शेलूबाजार | २० |
नागी | ३२ |
तपोवन | १० |
इचा | १५ |
येडशी | ९० |
चिखली | १५ |