Join us

"आज बांबू लागवड केली तर पुढच्या दोन पिढ्या उत्पन्न घेतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:09 AM

"शासनाकडून सध्या सुरू असलेल्या बांबू लागवड अल्प उपयोगी"

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम आय टी) कृषी अभियांत्रिकी विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शुक्रवार (दि.१२) रोजी "व्यावसायिक बांबू लागवड" एक दिवसीय परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात बांबू अभ्यासक अजित ठाकूर हे उपस्थित होते तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ यज्ञवीर कवडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

अजित ठाकूर यांनी जायजेंशिअस, ब्रॅंडीसा, ब्यासिफेरा, बांबूसा व इतर अशा विविध बांबूच्या जातीचे नमुने दाखवत त्यांची विस्तृत माहीती दिली. व्यावसायिक बांबू लागवड करतांना त्या बांबूचे वैशिष्ट्ये अवश्य बघावीत तसेच त्यापासून दीर्घ लाभ घ्यावा, उगीच फक्त दोन पैसे मिळतात म्हणून बांबू लागवड न करता, आज लागवड केली आणि व्यवस्थित व्यवस्थापन केले तर माझ्या पुढच्या दोन पिढ्या यातून उत्पन्न घेतील असे लक्ष ठेवून बांबूची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्याचे सुचविले. सोबत शासनाकडून सध्या सुरू असलेल्या बांबू लागवड मोहिमेवर टीका करत त्यातून लागवड होत असलेले बांबू अल्प उपयोगी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले तसेच अभ्यास करून बांबूंच्या जातींची माहिती घेऊन लागवड करण्याचे आव्हान केले. समारोपीय अध्यक्षीय भाषणात डॉ. यज्ञवीर कवडे यांनी भविष्यात मराठवाडा बांबू उत्पादक केंद्र व्हावं अशी आशा व्यक्त केली. त्याचबरोबर एम. आय. टी. संस्था शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करेल आणि रोपे पुरवठा करून येणाऱ्या बांबू मधील एक वाटा घेत सर्व मार्गदर्शन देईल असंही त्यांनी सांगितले. यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वातावरणीय बदलात देखील सक्षम करत बांबू लागवडीतून आत्महत्येच्या वाटेवर जाऊ न देण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू असे ते म्हणाले.

कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दीपक बोरणारे, एमआयटीचे संचालक डॉ. निलेश पाटील, श्रीमती प्राची बर्डे, प्राध्यापक, श्री अतुल गायकवाड, श्री चेतन निकम, डॉ बाबासाहेब सोनवणे, श्रीमती सुरेखा दाभाडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक बोरणारे यांनी तर सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी