Join us

अद्यावत व शाश्वत दुग्ध व्यवसायावर कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 10:15 PM

ही परिषद दोन दिवसांची असून कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात होणार आहे.

पुणे : ‘अद्ययावत व शाश्वत दुग्ध व्यवसाय’ या विषयावर पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे  दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात दिनांक ५ व ६ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. इंडियन डेअरी असोसिएशन, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे आणि बाएफ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे प्रमुख अतिथी मा. डॉ. जे. बी. प्रजापती, चेअरमन इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग) आहेत आणि डॉ. एन.व्ही. पाटील, मा. कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थान महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील भूषविणार आहेत.

या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट प्राणी जनुकशास्त्र आणि प्रजनन, वर्गीकृत लिंग वीर्याचा वापर, भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान, वासरांचे संगोपन, चारा व्यवस्थापन आणि मिथेनचे कमी उत्सर्जन, शेणखत व्यवस्थापन, लसीकरण आणि रोगासाठी रेशन, उच्च उत्पादकता आणि स्वच्छ दूध उत्पादन या विविध विषयांवर देशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक आपले शोध निबंध सादर करणार आहेत. या परिषदेमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना देणारे आणि इच्छुक असणारे प्रगतिशील दुग्ध व्यवसायिक शेतकरी, दुग्ध उद्योजक, दुग्ध व्यवसाय कंपन्या तसेच या बाबतीत धोरण ठरवणारे शासकीय अधिकारी, कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय शास्त्र विभाग, शिक्षण तज्ञ, कृषी, पर्यावरण आणि सामाजिक अभ्यास या क्षेत्रांशी निगडित असणारे तज्ञ आणि विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. तसेच देशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक आपले शोध निबंध सादर करणार आहेत.

गुजरात मधील आणंद कृषि विद्यापीठ आणि कामधेनु पशुवैद्यकीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक मा. डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) व शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार डॉ. सी. एस. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष डॉ. जे. व्ही. पारेख व के. शायजू, आणि सचिव श्री. माधव पाटकर सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर बाएफचे अध्यक्ष डॉ. बी. के. काकडे, वरिष्ठ सल्लागार डॉ. ए. बी. पांडे, उपाध्यक्ष डॉ. जे. आर. खडसे व डॉ. अलोक जुनेजा आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, आणंद चे समूह प्रमुख श्री. अनिल हातेकर आणि कृषि महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर उपस्थित राहणार आहेत. 

सदर परिषदेचे आयोजन सचिव देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख,डॉ. धीरज कणखरे हे असून संयुक्त आयोजन सचिव देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आणि इंडियन डेअरी असोसिएशन पुणे च्या सदस्या रिची अग्रवाल हे आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय