Join us

केव्हीकेमध्ये शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन; तज्ज्ञ करणार मार्गदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:19 PM

भारतातील कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाले त्यानिम्मित कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : 

भारतातील कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत कृषि तंत्रज्ञानाच्या प्रभावी प्रसारामध्ये आणि विविध विस्तार कार्यक्रम, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये केव्हीकेचे महत्वपूर्ण योगदान आहे.

असेच उल्लेखनीय कार्य प्रत्येक केव्हीकेंनी पुढेही सुरूच ठेवावेत. शेतकऱ्यांनी देखील शेती बद्दलच्या शास्त्रीय माहिती, शाश्वत कृषि निविष्ठा, तज्ज्ञ मार्गदर्शन यासाठी कृषि विज्ञान केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारत सरकारचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा. तसेच भविष्यात मत्स्यपालकांना देखील निधी स्वरूपात मदत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांनी चांगले व शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता दुग्ध प्रक्रिया उद्योग, मत्स्यपालन, रेशीम शेती अशा विविध कृषि पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. याचा सर्व शेतकरी बांधवांनी विचार करावा व कृषि पूरक व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करावा.

भारतात कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिम्मित संपूर्ण भारतात केव्हीके मार्फत २३ ते २८ सप्टेंबर, २०२४ दरम्यान “शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताह-२०२४” चे आयोजन करण्यात येणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोड येथील  केव्हीके द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सप्ताहाचे व शेतकरी सुवर्ण समृद्धी रथाचे उद्घाटन डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी केव्हीके येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय. डॉ. मधुरिमा जाधव, एनएआरपीचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सुर्यकांत पवार, भा. कृ. अनु. प.- केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुखधाने, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, श्री. अमोल शेळके, डॉ. विनय हत्ते, केव्हीकेचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतुरकर, इंजि. गीता यादव, अशोक निर्वळ, जिल्ह्यातील मत्स्यपालक, शेतकरी व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

डॉ.मोटे यांनी सांगितले की, जिल्हांमध्ये मत्स्यशेतीला खूप चांगली संधी असून शेतकरी बांधवांनी शास्त्रोक्त मत्स्यपालन करण्याची गरज आहे. कृषि विज्ञान केंद्रे हे जिल्ह्यात माहितीचे, प्रशिक्षणचे केंद्र म्हणून चांगले काम करत असून यापुढेही विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन केव्हीके मार्फत करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. जाधव यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी फायदा करून घेण्याचे आवाहन केले.

डॉ. पवार यांनी शेती बरोबर शेती पूरक जोडधंदे सुरु करण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्ह्यामध्ये कृषि उद्योजक निर्माण करण्यात केव्हीकेंनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यामुळे उद्योग सुरु करण्यासंबंधी प्रशिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केव्हीकेशी संपर्क करावा.

डॉ. सुखधाने यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यशेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गोड्या पाण्यात मत्स्यपालन करण्यासाठी उपयुक्त जाती, त्यांचे खाद्य व्यवस्थापन, मत्स्यबीज संचयन, मत्स्यपालनातील संधी आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.

यावेळी सहभागी सर्व मत्स्यपालकांना मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत देण्यात आलेल्या मासेमारी जाळी चे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर झाडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे आणि आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतुरकर यांनी मानले. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीऔरंगाबाद