Join us

विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या खरीप बैठकीचे पुण्यात आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:32 PM

खरीप हंगामासाठी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान आणि शिफारशींचे सादरीकरण होऊन कृषि विभागास हे तंत्रज्ञान आणि शिफारशी पुढील विस्तारासाठी देण्यात येणार आहेत.

पुणे : राज्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी चार कृषी विद्यापीठांकडून संशोधन करण्यात येते. तर संशोधन आणि शिफारशी राज्यात विस्तारासाठी कृषी विभागाकडे देण्यात येतात. यावर्षीची खरीप हंगामाची विभागीय बैठक पुणे येथे पार पडणार आहे. विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या खरीप-2024 या बैठकीचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी करण्यात आले असून पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनु सभागृह, पुणे येथे करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील असणार आहे. 

दरम्यान, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषि आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे, पशुसंवर्धन आयुक्त श्री. कौस्तुभ दिवेगांवकर, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनयकुमार आवटे उपस्थित असणार आहेत. ही बैठक संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या बैठकीमध्ये गतवर्षाचा पीक उत्पादनाचा आढावा आणि खरीप 2024 चे नियोजन बाबत सखोल चर्चा होणार आहे. 

खरीप हंगामासाठी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान आणि शिफारशींचे सादरीकरण होऊन कृषि विभागास हे तंत्रज्ञान आणि शिफारशी पुढील विस्तारासाठी देण्यात येणार आहेत. सदर बैठकीत खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजनासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीला कृषि विभागाचे सर्व संचालक, कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक