Lokmat Agro >शेतशिवार > आमचा हापूस जगात भारी; यंदा बागायतदारांसाठी हापूसची गोडी थोडी अधिक

आमचा हापूस जगात भारी; यंदा बागायतदारांसाठी हापूसची गोडी थोडी अधिक

Our Hapus is heavy in the world; Hapus is a little more sweet for farmer this year | आमचा हापूस जगात भारी; यंदा बागायतदारांसाठी हापूसची गोडी थोडी अधिक

आमचा हापूस जगात भारी; यंदा बागायतदारांसाठी हापूसची गोडी थोडी अधिक

सतत बदल होत असलेले हवामान, अत्यंत महाग झालेली औषधी आणि खते, कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेली काही वर्षे नुकसानीच्या गर्तेत सापडलेल्या हापूसला यंदा थोडे 'अच्छे दिन' आले आहेत.

सतत बदल होत असलेले हवामान, अत्यंत महाग झालेली औषधी आणि खते, कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेली काही वर्षे नुकसानीच्या गर्तेत सापडलेल्या हापूसला यंदा थोडे 'अच्छे दिन' आले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सतत बदल होत असलेले हवामान, अत्यंत महाग झालेली औषधी आणि खते, कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेली काही वर्षे नुकसानीच्या गर्तेत सापडलेल्या हापूसला यंदा थोडे 'अच्छे दिन' आले आहेत. अनेक अडचणी येऊनही आंब्याचे प्रमाण सध्यातरी चांगले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणखी मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात येईल, त्यामुळे यंदा बागायतदारांसाठी हापूसची गोडी थोडी अधिक झाली आहे

आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर हापूस म्हणजे जगात भारी चव. पातळ साल असलेला, पिवळसर भगवा हापूस दिसताक्षणी मन मोहवून टाकतो. साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात येऊ लागतात. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर सिंधुदुर्गचा हापूस बाजारात वर्दी देतो.

मार्च महिन्यात त्याच्या जोडीने रत्नागिरी, रायगडमधील हापूसही बाजारात हजेरी लावतो. गुढीपाडव्यानंतर मोठ्या दणक्यात हापूस बाजारात दाखल होतो आणि तेव्हापासून पाऊस पडेपर्यंत बाजारपेठेवर हापूसचेच राज्य असते.

चवीचा विचार केला तर हापूसपुढे आंब्याचे बाकी सर्व प्रकार फिके पडत असल्याने दर अधिक असला तरी हापूसलाच मागणी असते. जितका हापूस बाजारात जाईल, तो सर्व विकला जातो. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत हापूसचे प्रमाण कमी असल्याने बागायतदारांना दर खूपच चांगला मिळतो.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा बाजारात पाठवण्याची मानसिकता अजूनही कायम असल्याने मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात दाखल होतो आणि मग दरामध्ये घसरण होते; पण ग्राहकांच्या दृष्टीने तेव्हा दर आटोक्यात येत असल्याने हापूस बाजारातून कधी परत येत नाही.

कधी पीक कमी आल्याने बागायतदारांचे नुकसान होते. तर कधी पीक जास्त आल्याने दर पडतात. आंबा बागायतदारांचे हे दुखणे अनेकांना दरवर्षीची रड वाटते; पण हा व्यवसाय आता दरवर्षीच आंबा बागायतदारांच्या, डोळ्यांत पाणी आणत आहे. याचे सर्वांत मोठे कारण बेभरवशी हवामान.

चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा आणि चार महिने उन्हाळा हे ऋतुचक्र आता फक्त पुस्तकातच राहिले आहे. २००९ मध्ये आलेल्या फयान वादळानंतर हवामानात खूप बदल झाले आहेत. डिसेंबरपर्यंत डोकावत राहणारा पाऊस, कधीतरी उगवणारी थंडी आणि भाजून काढणारा उन्हाळा या ऋतुचक्राने हापूसची सगळी गणिते बिघडवली आहेत.

हापूस फक्त आणि फक्त हवामानावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाडांसाठी पोषक असतो. त्यानंतर 'ऑक्टोबर हीट'मुळे झाडांच्या मुळावर ताण येतो. त्यानंतर लगेचच चांगली थंडी सुरू झाली तर मोहोर चांगला येतो आणि उन्हाळा हलके हलके दाखल की हापूस तयार होतो. या ऋतुचक्रात बदल झाले की, औषधांची आणि खतांची फवारणी वाढते आणि तिथे बागायतदारांचे कंबरडे मोडते.

गतवर्षी पावसाळा मुबलक नव्हता; पण सरासरीइतका पाऊस पडला. 'ऑक्टोबर हीट'चे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मोहोर मुबलक आला. तोपर्यंत सर्व आलबेल होते; पण थंडीने घात केला. थंडीच्या लाटा वगळता हवामान कोरडेच होते. त्यामुळे मोहोरापासून फलधारणा अपेक्षेइतकी झाली नाही.

यंदा हवामानातील बदलांमुळे कीडरोगाचा त्रास अनेकदा झाला; मात्र सुदैवाने आताच्या घडीला गतवर्षीपेक्षा चांगले उत्पादन आहे. त्याला मुंबई बाजारात दरही चांगला आहे. अर्थात गेल्या चार दिवसांत उष्मा अचानक वाढला आहे. त्यामुळे आंबा भाजण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

तर आंब्याला दर चांगला मिळतो
सध्या झाडावर असलेले फळ पाहता १५ मेपर्यंत आंबा बाजारात येईल. त्यानंतर त्याचे प्रमाण अल्प असेल. शेवटच्या टप्प्यातील आंबा जूनच्या पहिल्या आठवड्यात हातात येईल. एकदा पाऊस पडला की, आंब्याचे दर खूपच खाली येतात. पाऊस लवकर सुरू झाला नाही तर शेवटच्या टप्प्यातील आंब्यालाही चांगला दर मिळतो. आता बागायतदारांचा एक डोळा बाजारावर, तर दुसरा डोळा हवामानावर आहे.

मनोज मुळ्ये
उपमुख्य उपसंपादक, लोकमत रत्नागिरी

Web Title: Our Hapus is heavy in the world; Hapus is a little more sweet for farmer this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.