Join us

राज्याबाहेरील शेतीचा अभ्यास दौरा; शेतकऱ्यांनो, तुम्ही अर्ज केला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:38 AM

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादनविषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादन विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादनविषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. शिवाय शेती अवजारे खरेदीसाठी अनुदानही देण्यात येते. 

अभ्यास दौऱ्यात काय पाहायला मिळणार?या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला व फुले लागवड विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. शिवाय इतर महत्त्वाच्या बाबींचाही समावेश आहे. फळबाग लागवड भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादींबाबत माहिती जाणून घेण्यात येणार आहे.

इच्छुकांनी असा करावा सविस्तर अर्ज..प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज, सात-बारा व ८ अ उतारा, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना जादा पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. फलोत्पादित उत्पादने ही नाशवंत स्वरुपाची असुन त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. मध्यस्थाचे वर्चस्व कमी करुन शेतकऱ्यांना जादा पैसे मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहकासही वाजवी किमतीत शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी कृषी विभागास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४ अंतर्गत शेतकऱ्यांची राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट कार्यक्रम राबविला जात आहे. शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती, कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत. - राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

टॅग्स :शेतकरीशेतीसरकारपीकशेती क्षेत्रफलोत्पादनकेंद्र सरकारराज्य सरकारसरकारी योजना